Wed, May 22, 2019 21:11होमपेज › Sangli › गैरव्यवहार झाल्यास कडक कारवाई

गैरव्यवहार झाल्यास कडक कारवाई

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 12:28AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पुरवठा विभागातील अधिकारी, ठेकेदार आणि पुरवठादार यांनी समन्वयाने काम करावे. मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, अपहार किंवा दलाली होत असेल तर जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्यानुसार कडक कारवाई करीन, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिला.

जिल्हा पुरवठा अधिकारी,   उपविभागीय अधिकारी,  तहसीलदार यांच्यासमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड आदि उपस्थित होते.

ना. बापट म्हणाले, रास्त भाव दुकानातील धान्य, इंधन ही दैनंदिन जीवनाशी आणि गरीब नागरिकांशी निगडित बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वप्रथम बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करण्यात आली. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यातील गावे,  नगरपरिषदा केरोसिनमुक्त करणे आणि आधार जोडणी या बाबींना सर्वच अधिकार्‍यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बोगस शिधापत्रिकांप्रकरणी सर्वच अधिकार्‍यांनी गांभीर्याने तपासणी करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी नियमितपणे रास्त भाव दुकाने, गोदामे, पेट्रोल पंप यांना अचानक भेटी द्याव्यात. त्यामध्ये नोंदवही, टँकरला जीपीएस प्रणाली, पेट्रोल पंपांचे ऑडिट रिपोर्ट यांची तपासणी करावी. 

भानुदास गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात 68.42 टक्के आधार सिडिंग झाले आहे. जवळपास रास्त भाव दुकानातील 82 टक्के व्यवहार ऑनलाईन होत आहेत. 35 रास्त भाव दुकाने व 36 केरोसिन परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यासाठी तितकेच जाहीरनामे काढण्यात आले आहेत. रास्त भाव दुकानांसाठी 35 अर्ज तर केरोसिन परवान्यांसाठी 17 अर्ज आले आहेत. या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 81 रास्त भाव दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. आटपाडी आणि कवठेमहांकाळ येथे नवीन गोदाम बांधण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. नवीन वाहतूक ठेक्यासाठी आणि कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.