मिरज : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी नियम व आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. अशी माहिती प्रभाग क्रमांक 6, 7, 19 आणि 20 चे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी येथे बैठकीत सांगितले.
निवडणूक नियम व अचारसंहितेची माहिती देण्याकरिता वरील प्रभागांतील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात गुरुवारी झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या. त्यांचे संजय पाटील यांनी निरसन केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडाव्या लागणार्या आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.एखाद्या उमेदवारा विरुद्ध हरकत घेणार्या संबंधिताने हरकत का घेतो आहोत याबद्दलचे कागदोपत्री पुरावे दिली पाहिजेत. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत हरकतधारकाची राहील, असे स्पष्ट करुन पाटील यांनी मतदान प्रतिनिधी नेमताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही याची काळजी घ्यावी. तसेच तो प्रभागातीलच मतदार असला पाहिजे, असे सांगितले.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त इतर पुरावे जोडू नयेत. तसेच शौचालयाबाबत दाखला असलाच पाहिजे. उमेदवाराची एका प्रभागाशिवाय आणखी काही प्रभागात नावे असतील तर कोणत्या प्रभागात मतदान करणार आहे, याबाबतचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शेवटच्या दिवशी सर्वांनी घाई करू नये. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. उमेदवारांची सूचक व अनुमोदक हे संबंधीत प्रभागातीलच असले पाहिजेत, असेही पाटील यांनी सांगितले.