Fri, Apr 26, 2019 03:36होमपेज › Sangli › वादळाचे थैमान : दोन ठार

वादळाचे थैमान : दोन ठार

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

जत तालुक्यात वीज, वादळी वारे आणि  पावसाने सोमवारी सायंकाळी थैमान घातले. त्यात अनेक घरांचे पत्र उडाले. घरांची पडझड झाली, झाडे पडली. विजेच्या तारा तुटल्या. निगडी खुर्द येथे घराची भिंत पडून अंबुबाई आबासाहेब जगताप (वय 50) या जागीच ठार झाल्या; तर  जाडरबोबलाद  येथे  अंगावर वीज पडून भीमराय शिवाप्पा हिचंगेरी (45) या शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान सांगली, मिरज शहरातही सायंकाळी पाऊस झाला. सांगलीच्या विश्रामबाग परिसरात सुमारे पंधरा मिनिटे पाऊस झाला. जिल्ह्यातही पावसाचे वातावरण होते. हवामान विभागाने जिल्ह्यात 24 तासांत वादळी वार्‍यासह पाऊस येईल, असा अंदाज सोमवारी सकाळी व्यक्‍त केला होता. सायंकाळी पाचपर्यंत हवेत चांगलाच उकाडा होता. सायंकाळी मात्र वातावरण पावसाळी झाले.

जत, येळवी, खलाटीत वादळ

येळवी : वार्ताहर

जत शहरासह येळवी, खलाटी, वाषाण, निगडी खुर्द, कोणीकोणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, टोणेवाडी, खैरावसह अनेक गावांत विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने तडाखा दिला. जत शहरात शहीद अंकुश सोलनकर चौकात झाड उन्मळून पडले. त्यामुळे सातारा रोडकडून शिवाजी पेठेकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती .विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेक गावांत अंधार होता. येळवी-जत रस्त्यावर निगडीनजीक  ठिकठिकाणी  झाडे व रस्त्यावर विजेच्या तारा पडल्या होत्या. निगडी आणि  येळवी येथे अनेक घरांचे पत्रे उडून व कौले पडून नुकसान झाले. तुकाराम बिरा काळे, ज्ञानू बिरा काळे, पांडुरंग रूपनूर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले . अनेकांच्या डाळिंब बागा जमीनदोस्त झाल्या. 

निगडी खुर्द येथे वादळी वारे आणि पावसामुळे पिंटू जगताप यांचे घर पडून अंबुबाई  जगताप  या जागीच ठार झाल्या. निगडी येथे तात्यासाहेब कोळी यांच्यासह चार जण जखमी झाले. अनेकांची घरे, पत्राशेड  वार्‍याने पडले. स्मशानभूमी जमीनदोस्त झाली.कोणीकोणूर येथे एकजण जखमी झाला.

जाडरबोबलादमध्ये शेतकर्‍याचा मृत्यू  

माडग्याळ  : वार्ताहर 

जाडरबोबलाद  येथे  अंगावर वीज पडून भीमराय  हिचंगेरी या शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला.  सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. वादळी वार्‍याने  जाडरबोबलाद, सोन्याळ, माडग्याळ सह पूर्वभागातील अनेक गावे  आणि मळ्यातील काही घरांवरील पत्रे उडून गेले. ठिकठिकाणी घराच्या भिंती पडल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. उमदी व परिसरात वार्‍यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे ; तर अर्ध्या तासानंतर वादळ शांत झाले.