Mon, Aug 26, 2019 01:42होमपेज › Sangli › जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको

जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 11:19PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील इस्लामपूर, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी, शिराळा, जत  तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी टायरी पेटवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी माधवनगर रस्त्यावर पोलिसांची गाडी उलटविण्याचा प्रयत्न केला. आटपाडीत आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. वाळव्या तालुक्यातील आंदोलकांनी पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करून ट्रकवर दगडफेक केली. तर पलूसमध्ये एका आंदोलकाने हाताची शीर कापून घेण्याचा प्रयत्न केला.

बंद, संपामुळे शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी  बंदला शहर व ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर सर्व व्यवहार ठप्प होते.मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिवसभर शहर, ग्रामीण आणि कर्नाटकातून मिरजेत होणारी आंतरराज्य एस.टी. वाहतूक बंद होती. कोणताही अनुचित प्रकार न होता बंद शांततेत पार पडला. रास्तारोको आंदोलना दरम्यान  डॉ. विकास पाटील, परशुराम चोरगे, विलास देसाई, अनिल रसाळ, बसवेश्‍वर सातपुते आदिंची भाषणे झाली. एका गुणाने संधी हुकल्यानंतर काय परिस्थिती होते, याची व्यथा डॉ. विकास पाटील यांनी मांडली. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मिरज आगारातून दररोज शहरी वाहतुकीच्या 330, ग्रामीण वाहतुकीच्या 302 बसफेर्‍या होतात. परंतु आज स्थानकातून एकही बस बाहेर सोडण्यात आली नाही. कर्नाटकातील विजापूर, अथणी, बागलकोट, चिक्कोडी, बेळगाव, हुबळी येथून सुमारे 250 बसफेर्‍या होतात. बंदच्या पार्श्‍वभूमीवर या फेर्‍याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातून कर्नाटकात ये-जा करणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांतही प्रवाशांची संख्या कमी होती. बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील शाळा, महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती. 

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा गेले तीन दिवस संप सुरू आहे. आजही सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज बंदच होते. शासकीय कर्मचार्‍यांचा बंद, मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र बंद आणि रास्तोरोको आंदोलनामुळे  दैनंदिन व्यवहारांवर मात्र मोठा परिणाम झाला होता.

मिरजेत दगडफेक

मराठा समाजास आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी आयोजित बंदमध्ये  शहरात  सायंकाळी हिरा हॉटेल चौकातील एका दुकानावर  दगडफेक करण्यात आली.

बुधगावात रस्ता रोको;सातजण ताब्यात

मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित बंदवेळी गुरुवारी बुधगाव नाका येथे टायर पेटवून रस्ता रोको केल्याप्रकरणी पोलिसांनी सात युवकांना ताब्यात घेतले. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. याबाबत जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकऱणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाल विठ्ठल पाटील (वय 26), पृथ्वीराज दत्तात्रय शिंदे (वय 21), जयदीप प्रकाश पाटील (वय 28), कुलदीप दत्तात्रय कदम, अवधूत संजय पाटील, सूरज मोहन बाबर, शुभम जगन्नाथ पाटील अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. बुधगाव (ता. मिरज) येथे जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी आदेश लागू केलेला असतानाही या युवकांनी बुधगाव नाका परिसरात टायर पेटवून रस्ता रोको केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सातहीजणांना सांगली ग्रामीण पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले होते. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. 

सांगलीत पोलिस जीप, फायर ब्रिगेडवर दगडफेक

सांगलीतील शास्त्री चौकात काही अज्ञातांनी रस्त्यावर टायर पेटवून ठेवले होते. या माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक अग्निशमन दलाची गाडी घेऊन शास्त्री चौकात गेले. तेथे पेटलेले टायर विझवत असताना शास्त्री उद्यानाच्या पिछाडीहून अज्ञातांनी पोलिस जीप आणि अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून समाजकंटकांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून गेले.