Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › शंभरफुटी अतिक्रमण मुक्‍तीसाठी रास्तारोको

शंभरफुटी अतिक्रमण मुक्‍तीसाठी रास्तारोको

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:04PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील महत्त्वपूर्ण शंभरफुटी रस्ता अतिक्रमणमुक्‍त करण्यासाठी शुक्रवारी मुस्लिम समाजाने नमाजपठणानंतर दुपारी रास्तारोको केला. महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक रस्ता खड्डेमय ठेवून अतिक्रमणाची सोय केल्याचा आरोपही करण्यात आला. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. रास्तारोकोची माहिती मिळताच महापौर हारुण शिकलगार घटनास्थळी धावले. त्यांनी आयुक्‍तांशी चर्चा करून लवकरच रस्ता दुरुस्ती आणि अतिक्रमणमुक्‍त करू, असे आश्‍वासन दिले. 

आंदोलनाचे नेतृत्व आसिफ बावा, लालू मेस्त्री, अज्जू पटेल, आश्रफ वांकर,  शाबाज नायकवडी, अंसारी सर, इम्रान पटेल, हफिज रउफ आदींनी केले होते. लालू मेस्त्री म्हणाले, शहरातील सर्वच रस्त्यांना जोडणारा कोल्हापूर रस्ता ते वालचंद कॉलेज हा शंभरफुटी रस्ता वाहतुकीची कोंडी फोडणारा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण वाढतच आहे. दुतर्फा गॅरेजसह विविध अतिक्रमणे आहेत. भरीस भर म्हणून महापालिकेने ड्रेनेज, पाण्याच्या पाईपलाईन खोदाईसाठी रस्त्यांची चाळण केली आहे.

बावा म्हणाले, वास्तविक गेल्या अनेक वर्षांत खड्ड्यांचे पॅचवर्क आणि डांबरीकरण झालेले नाही.  शंभर फुटी रस्त्यावर एका बाजूनेच अर्धवट डांबरीकरण केलेला 20-30 फुटी रस्ता उरला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एका बाजूला 50 फूट असलेला रस्ता दहा फुटी रस्ता  उरला आहे. उर्वरित रस्त्यावर वाहन दुरुस्तीचा उद्योग चालतो. त्यातून उरलेला रस्ता अतिक्रमणे, खड्ड्यांनी भरला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.वांकर म्हणाले, रस्ता दुरुस्तीसाठी अनेकवेळा आंदोलने केली. निवेदने दिली. पण काहीच उपयोग होत नाही. 

अतिक्रमणे हटवावे, पूर्ण रस्ता डांबरीकरण करून वापरात आणावा. यासाठी पाकिजा मश्चिद समोरच या भागातील नागरीकांनी जोरदार निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान महापौर हारुण शिकलगार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तयंनी अतिक्रण हटवून रस्ता डांबरीकरणाबाबत आयुक्तांशी चर्चा करुन मार्ग काढू अशी ग्वाही दिली.