Sun, Feb 17, 2019 17:11होमपेज › Sangli › इस्लामपुरातील फाळकूट दादांना ‘चाप’ हवा

इस्लामपुरातील फाळकूट दादांना ‘चाप’ हवा

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 11:15PMइस्लामपूर : मारूती पाटील

शहरात फाळकूटदादांचा उच्छाद वाढला आहे. राजकीय वरदहस्त  आहे. तसच पोलिसांचा वचक राहिला नसल्याने या फाळकूटदादांचा व्यापारी आणि  सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी वेळीच अशा दादांचा बंदोबस्त केला नाही तर शहरात गुन्हेगारी फोफावण्याचा धोका आहे. शहरात वेगवेगळ्या नावाने अनेक ग्रुप कार्यरत आहेत. या प्रत्येक ग्रुपला कोणीतरी राजकीय नेता ‘गॉडफादर’ आहे. राजकीय स्वार्थासाठी अनेकजण अशा ग्रुपना समाजसेवेच्या गोंडस नावाखाली पाठबळ देत आहेत. मात्र यातील अनेक ग्रुप केवळ गुन्हेगारी कारवायांमुळेच चर्चेत आले आहेत. ग्रुपच्या नावाखाली अनेक फाळकूटदादांनी शहरात उच्छाद मांडला आहे. 

शहरातील अनेक चौकात अशा फाळकूटदादांच्या टोळ्या दिवसरात्र ठाण मांडून असतात. महिला, विद्यार्थीनींची छेडछाड काढण्याचेही प्रकार   घडतात. रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीलाही त्यांच्याकडून अडथळा केला जातो. याचा जाब विचारणार्‍यांना त्यांच्याकडून दमबाजी केली जाते. रात्री उशिरा वाढदिवसाच्या नावाखालीही गोंधळ सुरू असतो. त्याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी गेल्या तरच पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र अनेकदा तक्रार करणारांनाच दमबाजी केली जात असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासही कोणी पुढे येत नाही.  

गेल्या महिन्या-दोन महिन्यात  मारामारीच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. यामध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या टोळक्यांचाच समावेश आहे. जमीन खरेदी व्यवहार, खासगी सावकारीतही यामध्ये गुंतलेले अनेकजण गुंडगिरीत सक्रीय आहेत. शहरातील अनेक व्यापार्‍यांना राजरोसपणे खंडणी मागण्याचेही प्रकार  या फाळकूटदादांच्याकडून होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र अनेक व्यापारी भितीपोटी पोलिसांकडे तक्रार करत नाहीत.  त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांचा त्यांच्यावर काहीच वचक राहिला नसल्याने दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारी कारवाया वाढू लागल्या आहेत. नुतन पोलिस अधिकार्‍यांनी ही गुन्हेगारी मोडून काढावी, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे. 

तक्रारींचीही दखल नाही...

काही दिवसांपूर्वी शहरातील एका मिठाई दुकानातील खराब ज्यूसचे प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी  प्रयत्न झाले.एकाने मिठाई दुकानदाराकडे तब्बल 7 लाखांची खंडणी मागितली होती. मात्र दुकानदाराने ती देण्यास नकार दिला. खंडणी मागितल्याचे फोन रेकॉर्ड पोलिसांना देऊनही  पोलिसांनी अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार करूनही  न्याय मिळत नसल्याची भावना व्यापार्‍यांची झाली आहे.