Mon, Jun 17, 2019 18:14होमपेज › Sangli › आटपाडी तालुक्यात कडकडीत बंद

आटपाडी तालुक्यात कडकडीत बंद

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 10:02PMआटपाडी : प्रतिनिधी 

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय धनगर समाज बांधवांनी पुकारलेल्या आटपाडी तालुका बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आटपाडी शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले होते. गावागावातील व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट होता. आटपाडी व खरसुंडी येथे बंद ठेवण्याच्या कारणावरुन दमदाटी करण्याचा प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला.

धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. धनगर आणि धनगड या शब्दांच्या गोंधळामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना अद्याप आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आटपाडी तालुक्यात आंदोलन करण्यात आले.

आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय धनगर समाज बांधवांनी आटपाडी तालुका बंद पुकारला होता. महाराष्ट्र बंदला आटपाडीकरांनी पाठिंबा देउन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.आटपाडी, दिघंची, करगणी, झरे, नेलकरंजी, खरसुंडी, कामथ, जांभुळणी, निंबवडे, घाणंद, घरनिंकी आणि तालुक्यातील सर्वच गावात बंद पाळण्यात आला.आटपाडीच्या साईमंदिर आणि दिघंची येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. बंदमुळे एस.टी. बसची सेवाही विस्कळीत झाली होती. काही गावात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

सकाळी 9 वाजता आटपाडीच्या साईमंदिर चौकातून धनगर समाज बांधवांनी मोटारसायकल रॅली काढली. आमच्या हक्काचे आरक्षण आता मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत आटपाडीतून ही मोटारसायकल  रॅली निघाली. आटपाडीतून दिघंची, निंबवडे, झरे, घरनिंकी, खरसुंडी,  नेलकरंजी, करगणी या गावांमध्ये जाऊन परत ही रॅली आटपाडीला आली. साईमंदिर चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी धनगर आणि धनगड या शब्दांचा घोळ घालत शासनाने गेल्या 70 वर्षांपासून समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला. 
महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव आता एकवटला आहे. त्यामुळे धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. दि. 31 अ‍ॅगस्टरोजी औरंगाबाद येथे होणार्‍या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.