होमपेज › Sangli › साखरेस ८५ टक्क्यांवर कर्जास राज्य बँकेचा नकार

साखरेस ८५ टक्क्यांवर कर्जास राज्य बँकेचा नकार

Published On: Jan 22 2018 5:05PM | Last Updated: Jan 22 2018 6:02PMसांगली : प्रतिनिधी

राज्य सहकारी बँक बाजारातील दरानुसार साखरेचे मुल्यांकन ठरविते. साखर पोत्यांवर ८५ टक्क्यांपर्यंतच तारण कर्ज दिले जाईल. कारखान्यांच्या मागणीनुसार ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज दिल्यास बँका अडचणीत येतील, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे यांनी दिले आहे. 

राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे, नाबार्डचे उपसरव्यवस्थापक डी. के. गवळी यांनी सोमवारी सांगली जिल्हा बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिह चव्हाण व संचालक उपस्थित होते. 

राज्य बँकेने साखरेचे मुल्यांकन घटविले आहे. त्यामुळे साखर कारखाने चिंतेत आहेत. उसाला ‘एफआरपी’नुसार दर देताना कारखान्यांची कसरत होणार आहे. साखर पोत्यांवरील तारण कर्ज ८५ टक्क्यांऐवजी ९५ टक्के करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केलेली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता सुखदेवे म्हणाले, साखर पोत्यांवर ८५ टक्क्यांपर्यंतच तारण कर्ज दिले जाईल. ८५ टक्क्यांवर तारण कर्ज देता येणार नाही. 

साखरेचे मुल्यांकन असे ठरते..!

तीन महिन्यांचा साखरेचा सरासरी दर किंवा साखरेचा बाजारातील आजचा दर यातील जो दर कमी असेल तो निश्‍चित केला जातो. त्यावर ८५ टक्क्यांपर्यंत तारण कर्ज दिले जाते. बाजारातील साखरेचा दर  मुल्यांकन यात १५ टक्के नफा ठेवला जातो. त्यामुळे ८५ टक्क्यांपर्यंतच साखरेवर तारण कर्ज देता येईल. ८५ टक्क्यांवर तारण कर्ज दिले जाणार नाही. ८५ टक्क्यांहून अधिक कर्ज दिले तर बँका अडचणीत येतील, असे सुखदेवे यावेळी म्‍हणाले.

राज्य बँक तोट्यातून नफ्यात आली आहे : सुखदेवे

राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे म्हणाले, राज्य बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. सन २०१० मध्ये राज्य बँकेचे नेटवर्थ उणे होते. दि. ३१ मार्च २०१७ रोजी ते + (अधिक) २ हजार २१० कोटी रुपये झाले आहे. सीआरएआर किमान ९ टक्के पाहिजे, तो १४.५६ टक्के आहे. बँकेला ७७६ कोटी तोटा होता,  ती बँक २४६ कोटी रुपये नफ्यात आली आहे. बँकेने सलग तीन वर्षे १० टक्के लाभांश दिलेला आहे. नेट एनपीए अवघा ०.५६ टक्के आहे. ठेवी ९ हजार कोटींवरून १६ हजार ५०० कोटींवर गेल्या आहेत. थकित कर्जाच्या वसुली बरोबरच राज्य बँकेने व्यवसायवृद्धीही केली आहे.