Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Sangli › परिवर्तनाची सुरुवात महापालिकेतून करा

परिवर्तनाची सुरुवात महापालिकेतून करा

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:33AMसांगली : प्रतिनिधी

मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत, शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण, व्यापारी, उद्योजक आदी सर्व समाजघटकांची फसवणूक भाजप सरकारने केली आहे. भाजपविषयी आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांच्यात प्रचंड संताप आहे. त्यामुळे देश आणि राज्यात परिवर्तन अटळ आहे. या महापरिवर्तनाची सुरुवात सांगली महापालिकेच्या निवडणुकीपासून करा, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी सांगली महापालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी पाटील यांनी काँग्रेसला आघाडीचे निमंत्रणच दिले. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार सुमनताई पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, माजी महापौर सुरेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई पाटील, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा विनया पाठक प्रमुख उपस्थित होत्या. 

मुंडे म्हणाले, लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत दिल्लीत आणि मुंबईतही सत्तापरिवर्तन आता अटळ आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न जनतेला दाखविले होते. मात्र आज या ‘अच्छे दिन’ची देशभर चेष्टा सुरू आहे. केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.  विदेशातील काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार असे स्वप्न मोेदींनी दाखविले. पण विजय मल्ल्या, ललित मोदी, निरव मोदींनी बँकांमधून हजारो कोटी रुपये लुटून नेले. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावरच 15 लाखांचे कर्ज झाल्याशिवाय राहणार नाही. 

महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल 50 रुपयांवरून 84, डाळी 60 रुपयांवरून 150 आणि घरगुती गॅस सिलिंडर 375 रुपयांवरून 820 रुपये झाला आहे. वर्षाला 6 कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्‍वासन मोदींनी दिले होते. पण चार वर्षात 6 लाख रोजगार निर्माण झाले नाहीत. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपला डोक्यावर घेणारी तरूणाईच आता 2019 च्या निवडणुकीत भाजपला पायाखाली चिरडील, असा इशाराही मुंडे यांनी दिला. 

मुंडे म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सांगलीच्या विकासासाठी कोणती योजना आणली? किती निधी दिला? भाजप सरकारच्या विरोधात राग व्यक्‍त करण्यासाठी देशातील जनतेला लोकसभा निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे, पण सांगलीच्या जनतेला ही संधी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे.   देश, राज्यातील महापरिवर्तनाची सुरूवात सांगली महापालिका निवडणुकीपासून करा. 

दुबळे म्हणून नव्हे...!

जयंत पाटील म्हणाले, समाजासमाजात दुही माजवण्याचे काम भाजप सरकार करत आहे.अल्पसंख्यांक, दलित समाज भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे म्हणू लागला आहे. त्यामुळे दुबळे म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेची भावना लक्षात घेऊन आम्ही समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करीत आहोत. महाआघाडीच्या कालावधीत 550 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला होता. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील विविध विकास कामे मार्गी लावली होती. आता सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी पुन्हा राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहनही पाटील यांनी केले. 

सांगली शहरात राष्ट्रवादीत काही मतभेद होते. पण ते बाजूला ठेवून सर्वजण एकसंघपणे एकत्र आले आहेत. एकत्रितपणे महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. 
प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले,  अर्थमंत्री, ग्रामविकासमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी केलेले काम राज्यात इतिहासात नोंदविण्यासारखे आहे. अशा चांगल्या नेत्यांच्या मागे जनतेने उभे राहणे ही काळाची गरज आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले,  महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्यास राष्ट्रवादी तयार आहे. प्रा. पद्माकर जगदाळे म्हणाले, महापालिका निवडणुकीत धर्मनिरपेक्ष शक्तींच्या वेगवेगळ्या चुली नकोत. जातीयवादी भाजप विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. कमलाकर पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत आघाडी करा अथवा नाही करा, राष्ट्रवादी सत्ता खेचून आणणार. सुरेश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, विष्णू माने, राहुल पवार, शेडजी मोहिते, सचिन जगदाळे, प्रमोद इनामदार, विनया पाठक यांचीही भाषणे झाली. यावेळी मनोज शिंदे, श्रीनिवास पाटील, छाया जाधव, दिग्विजय सूर्यवंशी, योगेंद्र थोरात उपस्थित होते. 

राग व्यक्‍त करा; अन्यथा नसबंदीही करतील

मुंडे म्हणाले, भाजप सरकारने मांसबंदी केली, नोटाबंदी केली, तरीही नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपलाच यश मिळाले. तेव्हा भाजपने लोकांना गृहीत धरले आहे. भाजपचे सर्व निर्णय लोकांना मान्य आहेत, असेच त्यांची धारणा आहे. त्यामुळे जनतेने आता भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात राग व्यक्‍त केला पाहिजे; अन्यथा मोदीबाबा जनतेची नसबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत.