Wed, Apr 24, 2019 20:03होमपेज › Sangli › जिल्ह्यातील दूध संकलन पूर्ववत सुरु

जिल्ह्यातील दूध संकलन पूर्ववत सुरु

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 8:16PMसांगली : प्रतिनिधी 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतल्याने जिल्ह्यातील दूध संकलन पूर्ववत सुरू झाले आहे. शहरांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे. दरवाढीने शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण आहे. गायीच्या दुधाला दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारले होते. सांगली जिल्ह्यात संघटना प्रबळ असल्याने येथे आंदोलन बर्‍यापैकी झाले. विशेषत: पश्‍चिम भागातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव या तालुक्यातील दूध उत्पादक आंदोलनात सक्रिय होते. तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, जत  या  दुष्काळी भागातील शेतकर्‍यांनी आंदोलनास प्रतिसाद दिला. पहिले दोन दिवस दूध संकलन बंद ठेवले होते. तिसर्‍या दिवशी ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आले. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. अनेक शेतकर्‍यांनी देवतांना व मंत्र्यांच्या प्रतिमांना अभिषेक घातले. काहींनी गरिबांना, विद्यार्थ्यांना वाटप केले. पिकांवर दूध फवारण्याचा अनोखा फंडाही काही शेतकर्‍यांनी वापरला. 

परिणामी तीन दिवसांत जिल्ह्यातील सुमारे 40 लाख लिटर दुधाचे संकलन होऊ शकले नाही. याचा फटका संघांना मोठ्या प्रमाणात बसला. शहरांत दूध टंचाई निर्माण झाली होती. आणखी काही दिवस आंदोलन ताणले गेले असते तर ग्राहकांत उद्रेक झाला असता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संतप्त भावनांची सरकारने दखल घेवून प्रतिलिटर 5 रुपये दरवाढ जाहीर केली आहे. या वाढीमुळे संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. जिल्ह्यातील सहकारी व खासगी संघांनी संकलन पूर्ववत सुरू केले आहे. टँकर शहरांकडे रवाना होऊ लागले आहेत. मुंबई, पुण्याचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.गावो-गावच्या संकलन केंद्रांवर दूध आंदोलनाचीच चर्चा आहे. आंदोलनामुळे न्याय मिळाला, अशी भावना शेतकर्‍यांत आहे.