Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Sangli › ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 10 2018 8:42PMशिराळा  : विठ्ठल नलवडे 

तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तीनही प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. या तीनही पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर आघाड्या केल्या आहेत. वाकुर्डे बुद्रूक योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. एकूण 27 पैकी17 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित आहे. 

आमदार शिवाजीराव नाईक,  माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या तीन प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीत वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रचार यंत्रणा उभी केली आहे. गावपातळीवरील कार्यकर्त्यांचे मतभेद ही नेत्यांची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विविध पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. परिणामी प्रत्येक गावात आघाडीनुसार प्रचारात मुद्दे मांडले जातील. टीकाही केली जाईल.

तालुक्यातील अनेक गावांमधील  लोक मोठ्या संख्येने मुंबई येथे  राहतात.  त्यामुळे प्रचार यंत्रणा राबवताना नेते व उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. काही गावांमध्ये बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्राथमिक चर्चा व बैठका सुरू आहेत.शिरशी, इंगरुळ, भाटशिरगाव वाकुर्डे बुद्रुक, पणुंब्रे तर्फ वारुण, रिळे या गावात निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

सध्या  काँग्रेसकडे  10, राष्ट्रवादी काँग्रेस 7, भाजप 5, भाजप-राष्ट्रवादी आघाडी 2, काँग्रेस आघाडी 1, मनसे 1 आणि दोन्ही काँग्रेस  व भाजप यांच्या आघाडीकडे 1 अशी सत्ता आहे.  कुसळेवाडी, वाकुर्डे बुद्रुक, प.त. शिराळा आणि मराठवाडीत भाजप व राष्ट्रवादी, शिरसटवाडी, सावंतवाडी, खुजगाव, शिरशी, रांजणवाडी, मेणी या ठिकाणी काँग्रेस व भाजप आघाडी, चिंचेवाडी, रिळे या ठिकाणी काँग्रेस आघाडी होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडी येथे मनसेविरुद्ध तीनही  पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवली जाईल, अशी चिन्हे आहेत. करुंगली, धसवाडी, मोरेवाडी येथे बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत.

वाकुर्डे बुद्रुक योजना तसेच सध्याच्या सरकारकडून होणारी किंवा न होणारी विकासकामे, नोटबंदी आणि जीएसटीमुळे लोकांचे  झालेले हाल असे प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील. कोणी किती विकास निधी आणला याबद्दलही चर्चा आणि टीका-प्रतिटीका होणार आहे.

तळ्यात-मळ्यात असलेल्या कार्यकर्त्यांचे इकडून तिकडे सुरू झाले आहे. त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. यामुळे काहीवेळा  निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे नेत्यांचे दुर्लक्ष  होत आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. त्यांची मनधरणी आता सुरू आहे.