Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Sangli › दुबार कामांवरून स्थायीत खडाजंगी

दुबार कामांवरून स्थायीत खडाजंगी

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 11:29PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

रस्त्यासाठीच्या शासन आणि महापालिका निधीतून होणार्‍या दुबार कामांवरून मंगळवारी स्थायी समिती सभेत खडाजंगी झाली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा घोळ झाला, यात पदाधिकारी नगरसेवकांचा काय दोष, असा संतप्त सवाल सदस्यांनी विचारला. यावरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पालकमंत्री माहिती न घेता काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करतातच कशी, असा सवालही सभापती बसवेश्‍वर सातपुते यांच्यासह सदस्यांनी केला. 

यावर आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी दोन दिवसांत दुबार कामांची चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन दिले. ज्या रस्त्याची दोनदा कामे धरली आहेत, त्यात समन्वयाने मार्ग काढून त्याच प्रभागातील लगतच्या रस्त्याची कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  महापालिकेने त्यांची कामे रद्द करावीत, असे आदेश दिले आहेत. शिवाय शासन निधीतूनच कामे करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या आहेत. यावरून मृणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्या म्हणाल्या, आमदार निधीतील रस्त्याच्या कामांना महापालिका प्रशासनाने  ना हरकत दाखला दिला. मग महापालिकेने मंजूर केलेल्या रस्त्याच्या यादीत तेेच रस्ते धरले गेले, यात आमचा काय दोष? पालकमंत्री महापालिकेचा भोंगळ कारभार कसे म्हणतात, याचीच चैाकशी करण्यात यावी.

रोहिणी पाटील यांनी बायनेम कामांतील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड केला. त्या म्हणाल्या, प्रत्येक सदस्याची 50 लाखांची कामे धरली जातात. बायनेम तरतुदीमधील रक्कम प्रशासनाच्या त्रुटीमुळे दुसर्‍या सदस्याच्या प्रभागातील कामासाठी धरली गेली आहे. प्रशासनाने टेंडर काढण्यासाठी प्रक्रिया राबवली असताना हा प्रकार उघडकीस आला.  

आयुक्त खेबुडकर म्हणाले, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहमतीने  यावर मार्ग काढला जाईल. दोन दिवसांत यावर निर्णय घेऊ. कारभारही नाही, केवळ तांत्रिक चुकांमुळे हा गोंधळ झाला आहे.