Fri, Apr 26, 2019 18:02होमपेज › Sangli › धर्मनिरपेक्ष विचारांच्या पाठीशी उभे रहा

धर्मनिरपेक्ष विचारांच्या पाठीशी उभे रहा

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 12:15AMमिरज : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक ही दोन विचारांची लढाई असून नागरिकांनी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी  येथे केले. प्रभाग क्र. 3 मधील कार्यकर्ते व नागरीकांच्या बैठकीत   पाटील बोलत होते. त्यांनी अच्छे दिन आणण्याचा नारा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका केली. धर्माधर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आमदार पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षांत भाजप सरकारच्या कारकीर्दीत देशातील अल्पसंख्यांक सुरक्षित राहिलेले नाहीत. दलितांवरील अत्याचार  वाढले आहेत.   पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  आलेल्या  निनावी धमकी पत्रांची भाजपकडून स्टंटबाजी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.आमदार पाटील म्हणाले, विरोधी पक्षात असताना आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये  मोठा फरक पडला आहे. त्यांनी आता निवडणुकांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या पद्धतीचा पुरस्कार केल्याचे ऐकून मला धक्काच बसला.  या महापालिका निवडणुकीसाठीही भाजपकडून मतदारांना भेटवस्तू देण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे. नागरिकांनी या भेट वस्तूंना भुलून जाऊ नये.

महापालिका राजकारणात धर्मनिरपेक्ष छत्राखाली वाढून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेल्यांचाही  जयंत पाटील यांनी  समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपमध्ये गेलेलेही काही काळ आमच्यासोबत होते. त्यांना काय हवे आहे, ते सर्वांना माहीत आहे. त्यांनी पक्षांतर करताना मतदारांना विचारले का? आम्ही या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे आणि नव्या दमाचे उमेदवार देणार आहोत.
 माजी महापौर मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज,   विराज कोकणे इत्यादी उपस्थित होते.