Wed, May 22, 2019 23:20होमपेज › Sangli › शहरात सफाईचा बोजवारा; साथींचा फैलाव

शहरात सफाईचा बोजवारा; साथींचा फैलाव

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 18 2018 9:11PMसांगली : प्रतिनिधी

निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन, कारभारी मग्न होते. तेव्हापासून शहरातील कचरा उठाव, सफाई, औषध फवारणीचा  कारभार जणू ठप्पच झाला आहे. त्यामुळे जागोजागी कचर्‍याचे ढीग साचून नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात आता साथीच्या रोगांचा फैलाव होऊ लागला आहे. मात्र, नव्याने निवडून आलेले नगरसेवक सत्कार, सहलीत मग्न आहेत. दुसरीकडे प्रशासनाचे अधिकारीही आता विश्रांतीच्या मूडमध्ये असल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

नागरिकांच्या कचरा उठाव, साफसफाई, दिवाबत्ती, स्वच्छ पाणीपुरवठा या मूलभूत गरजा आहेत. त्यासाठीच महापालिकेचा डोलारा आहे. वास्तविक प्रभागनिहाय मुकादम, कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करून ही यंत्रणा दररोज राबत असते. या यंत्रणेवर ज्या-त्या नगरसेवकांचाही वॉच असतो. 

पण महापालिका निवडणूक सुरू झाल्यापासून गेल्या दोन-अडीच महिन्यांत आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. शहरात दररोज सुमारे दोनशे टनांहून अधिक कचरा निर्माण होतो. त्यातील निम्म्याहून अधिक कचरा उठाव आता ठप्प झाला आहे. त्यामुळे जागोजागी कचरा कुंड्या, कंटेनर ओसंडून वहात आहेत. दुसरीकडे गटारी, रस्तेसफाई ठप्पच आहे. त्यामुळे मुख्य चौक, रस्ते आणि उपनगरांमध्ये रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भरीस भर म्हणून पावसाने हा कचरा कुजून डासांचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. 

उपनगरांत तर अनेक ठिकाणी खुल्या भूखंडांवर पाण्याचे तळे साचले आहे. त्यातच जागोजागी कचरा साचून तो कुजून दुर्गंधी पसरू लागली आहे. वास्तविक डासांचा फैलाव रोखण्यासाठी नियमित औषधफवारणी होणे गरजेचे आहे. परंतु याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अनेक भागात हे भूखंड आणि त्यातील तळ्यांमध्ये साप, विंचवांचा वावर आहे.  

वास्तविक जनतेेने कररूपी मोजलेल्या निधीतून या यंत्रणेवर लाखोंचा खर्च होतो. डासप्रतिबंधक औषधांच्या खरेदीचाही सपाटा सुरूच आहे. मग औषधफवारणी न होता हे औषध जाते कुठे, असा नागरिकांतून संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

रुग्णांची वाढती संख्या ; यंत्रणा मात्र सुस्तच

एकीकडे साफसफाई, कचरा उठावचा बोजाबारा झाला आहे. त्यामुळे आता हवामानात बदल आणि डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांचा फैलाव सुरूच आहे. एकेका भागात पाच-पंचवीस रुग्ण आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कृपेने रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. अनेकजण खासगी रुग्णालयांत उपचारही घेत आहेत. पण आरोग्य विभागाकडून कोठेच सर्व्हे नाही, कोणत्याही उपाययोजना नाहीत. अशा अनागोंदी कारभारामुळे साथीने बळी गेल्यानंतर यंत्रणा जागी होणार का? अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त होत आहेत. 

स्वच्छ भारत अभियानाचा फार्सच

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने देश-राज्यपातळीवर स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यासाठी आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी प्रशासनाला कामाला लावले. परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुन्हा यंत्रणेने याकडे दुर्लक्षच केले आहे. एकीकडे अभियानात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका 119 वी आली आहे. ती लवकरच 50 च्या आत आणू, असा खेबुडकर यांनी विडा उचलला आहे. पण प्रशासनाचा उदासीन कारभार पाहता या मोहिमेला हरताळच फासल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घ्यावी लागणार आहे.