होमपेज › Sangli › मतदार यादी अपडेट्साठी उद्या विशेष अभियान

मतदार यादी अपडेट्साठी उद्या विशेष अभियान

Published On: May 05 2018 1:38AM | Last Updated: May 05 2018 1:37AMसांगली ः प्रतिनिधी

महापालिकेसह आगामी लोकसभा, विधानसभा मतदार याद्या अपडेटसाठी रविवारी (दि. 6) फक्‍त मनपा क्षेत्रात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सांगली, मिरज विधानसभेला पूर्वी झालेल्या फक्‍त शहरातील मतदान केद्रांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5  या वेळेत ही सोय करण्यात आली आहे. यामध्ये मतदान ओळखपत्रात ज्यांची एमटी सिरीजमध्ये कृष्णधवल फोटो आहेत त्यांचेच रंगीत फोटो जमा करून घेतले जाणार आहेत. 

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सांगली विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी भानुदास गायकवाड आणि महापालिका  आयुक्त रविंद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठक घेतली. यावेळी ही माहिती दिली.

गायकवाड म्हणाले, महापालिकेच्या सांगली मतदारसंघात 2 लाख 65 हजार 340 मतदार संख्या आहे. यामध्ये ज्यांचे फोटो मतदारयादीत नाहीत, रंगीत नाहीत अशांना नोटीसा बजावल्या जाणार आहेत. यामध्ये एमटी सिरीज ही 1996 मध्ये काढलेल्या ओळखपत्रांची असून, त्यांचे मतदार याद्यांमध्ये कृष्णधवल छायाचित्रे आहेत. आता नवीन रंगीत फोटो जमा करण्याचे काम सुरु आहे. विधानसभा, लोकसभेची निवडणूकीसाठीची ही तयारी सुरु आहे. मतदार यादी अद्यावत करण्यासाठी हे अभियान आहे.  

खेबुडकर म्हणाले, महापालिका निवडणूक असल्याने 11 मेपर्यत नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे. यामध्ये ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2018 पूर्वीची आहे त्यांना नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी 6 नंबरचा अर्ज भरावा. एकूणच 11 मे पर्यत नावाचा समावेश करणे, नाव कमी करणे, दुरुस्ती करणे, स्थळ बदल यासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.
ते म्हणाले, गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्या मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान केले त्याच मतदान केंद्रावर फोटो, दुरुस्तीच अर्ज द्यायचे आहेत.