होमपेज › Sangli › आत्मविश्‍वासातूनच यश शक्य : नांगरे - पाटील

आत्मविश्‍वासातूनच यश शक्य : नांगरे - पाटील

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 7:29PMनेर्ले : वार्ताहर

जिद्द, आत्मविश्‍वासातूनच यश शक्य असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. ‘भावड्या, मला तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं बघायचं आहे’ या आपल्या वडिलांच्या एका वाक्याने आपल्यात प्रचंड ऊर्जा निर्माण केली आणि आपण ध्येयापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

सुरूल (ता. वाळवा) येथे ‘व्यसनमुक्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयांवर नांगरे-पाटील यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.  सरपंच कुंदा पाटील यांनी संयोजन केले होते. नांगरे-पाटील म्हणाले, आपण अनेक ग्रंथ, पुस्तके वाचली. पण वडिलांच्या त्या एका वाक्याने मनामध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला.  वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईची वाट धरली. अत्यंत खडतर  वाटचाल केली. 10 रुपयाच्यावर  राईसप्लेट खायची खिशाने कधी परवानगी दिली नव्हती. अधिकारी होईन की नाही माहीत नव्हते, मात्र जिद्द, चिकाटी अन् आत्मविश्‍वास होता म्हणून यश मिळत गेल्याचे त्यांनी सांगितले. सुरूलमध्ये जि. प. शाळेतील ‘बोलक्या भिंती’ आपल्या शिक्षण आणि संस्काराची प्रचिती देत असल्याचे ते म्हणाले.    

श्री. नांगरे-पाटील म्हणाले,  चांगुलपणा आता फार दुर्मिळ होत चाललाय. प्रत्येक वेळ ही परमेश्‍वराने दिलेली आहे. त्यामुळे शुभ किंवा अशुभ वेळ नसते. मिळालेल्या वेळी कष्ट करा, घाम गाळा यश नक्की मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा, असा सल्ला त्यांनी अवघ्या तरुणाईला दिला.

निवृत्त उपजिल्हाधिकारी डी. एस. पाटील,  रेठरेधरणच्या  सरपंच लतिका पाटील, जिल्हा परिषद सदस्या संध्याराणी पाटील, पंचायत समिती सदस्य शंकर चव्हाण, नामदेव बापू पाटील, सोसायटीचे अध्यक्ष पोपट पाटील, चेतन पाटील, मधुकर पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच कुंदा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धनंजय पाटील यांनी आभार मानले.