Thu, Apr 25, 2019 13:31होमपेज › Sangli › नेवरी परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग

नेवरी परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:37PMनेवरी : वार्ताहर

नेवरी परिसरात शेवटच्या टप्प्यात  वळवाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी  पेरा वेळेवर  होईल, असे शेतकर्‍यांतून बोलले जात आहे.गेल्या दोन ते तीन वर्षापासून पुरेसा पाऊस नसल्याने खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस झालाच नाही. यामुळे खरीप पेरा होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्‍यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या परिसरात पाऊस झाला नाही. यामुळे मान्सून पूर्व पावसाच्या अभावामुळे पेरणीपूर्व मशागतींची कामे खोळंबली होती. सध्या शिवारात शेतीच्या कामांना गती आली आहे. शेजारच्या गावांतून कामासाठी मजुरांना पाचारण केले जात आहे. प्रत्येक गावात बैलजोड्या नाममात्र राहिल्या आहेत. यामुळे ट्रॅक्टरशिवाय मशागत करणे याला पर्याय राहिलेला नाही. यातच डिझेलचे दर वाढले आहेत.  याचा शेतीमशागत कामावर चांगलाच परिणाम दिसून येत आहे.