Thu, Apr 18, 2019 16:18होमपेज › Sangli › अत्याधुनिक जलशुद्धिकरणाचा फ्लॉप शो

अत्याधुनिक जलशुद्धिकरणाचा फ्लॉप शो

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 8:48PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस, राष्ट्रवादीने अत्याधुनिक 70 एमएलडी जलशुद्धिकरण केंद्राचे उद्घाटन करून शहराचा पाणीप्रश्‍न मिटल्याचे जाहीर केले. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून सांगली, कुपवाडमधील अनेक उपनगरांत पाण्याचा ठणठणाट सुरू आहे.शुद्धिकरणाचाही खेळखंडोबा असून, दूषित व जादा घनता असलेले पाणी पाजून जनतेवर विषप्रयोगच सुरूआहे.पाणीगळती, क्रॉस कनेक्शनसह अनेक कारणांनी पाणीटंचाई असल्याचा निर्वाळा पाणीपुरवठा विभागाकडून दिला जात आहे. परंतु 70 एमएलडीचे कामच पूर्ण नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उद्घाटनाचा फार्स केल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने, जिल्हा सुधार समिती आदींनी केला आहे.

माळबंगला येथे 56 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण झाले. शिवाय 70 एमएलडी नवीन अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. त्यातून सांगली, कुपवाडला 2040 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेता शुद्ध व मुबलक पाणी मिळेल, असा दावाही उद्घाटनाच्या वेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला होता.परंतु उद्घाटनानंतर पाणीटंचाई दूर होण्याऐवजी समस्या अधिक वाढल्या आहेत. सांगलीतील रामकृष्ण परमहंस सोसायटी, अष्टविनायकनगर, शामरावनगर, रुक्मिणीनगर, कोल्हापूर रस्त्यावरील अनेक उपनगरांत अर्धा तास कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. सांगलीतील दत्तनगर, काकानगर, पंचशीलनगरातही पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. कुपवाडमधील लक्ष्मीनगर, शामनगरसह अनेक भागातही पाणीटंचाई आहे. मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने उपसा बंद होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये म्हणाले, अनेक ठिकाणी क्रॉस पाईपलाईनची कामे सुरू आहेत. शिवाय पाणीटाक्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. यामुळे काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत.

56 एमएलडीच पाणीउपसा; बिलांचा बोजा वाढला

नगरसेवक  माने म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीने 70 एमएलडी जलशुद्धिकरण योजनेच्या उद्घाटनाची स्टंटबाजी केली. परंतु जलशुद्धिकरणासाठी आवश्यक 350 एचपीच्या दोन मोटारी जॅकवेलवर बसवून पाणीउपसा वाढविलेला नाही. एकूण 126 एमएलडी जलशुद्धिकरण यंत्रणा असल्याचे सांगितले जाते, पण 60-62 एमएलडीच पाणीउपसा होतो. त्यामुळे 70 एमएलडी केंद्राच्या उद्घाटनाने फायदा नव्हे  तर तोटाच झाला आहे. जेथे पुरेसा पाणीपुरवठा होत होता तेथे  आता अर्धा तासही पाणी मिळत नाही. रमजानच्या महिन्यात  टंचाई अधिक वाढली आहे. दुसरीकडे अपूर्ण योजना पूर्ण दाखविल्याने लक्ष्मी इंजिनिअरिंग या कंपनीला देखभाल-दुरुस्तीसाठी वार्षिक 2.45 कोटी रुपयांचा मोबदला सुरू केला आहे.

मिरजेपेक्षा सांगलीचे पाणी पाचपट खराब

मिरजेपेक्षा दर्जेदार असे सांगलीत अत्याधुनिक 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. परंतु दुर्दैवाने सांगलीत अजूनही मिरजेच्या तुलनेत पाचपट खराब पाणीपुरवठा होतो. मिरजेत पाणी शुद्धीकरणासाठीची पध्दत चांगल्या पध्दतीने अवलंबण्यात येते. त्यामुळे तेथे वजा 1 एनटीयु क्षमतेचे इतके शुद्ध पाणी मिळते. अंदाजपंचे शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्याने  सांगलीत तेच पाणी 5 ते 6 एनटीयु इतके खराब असते. पाण्याचा टीडीएसही 210 च्या दरम्यान असतो. तो किमान 50 पर्यंत खाली येणे आवश्यक असते. पण प्री क्‍लोरिनेशन, को अ‍ॅक्युलेशन आदी प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याचा येथे हा परिणाम आहे. यामुळे गढूळता अधिक आणि शेवाळ उत्पत्ती होऊन शुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थित होत नाही.