होमपेज › Sangli › ‘सोनहिरा’ला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर

‘सोनहिरा’ला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 11:26PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास यावर्षीचा  देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने जाहीर केला आहे. आजपर्यंत या कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, देशात सर्वोत्कृष्ट असा पुरस्कार मिळाल्याने या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कडेगावसारख्या दुष्काळी तालुक्यात डॉ. पतंगराव कदम यांनी या कारखान्याची उभारणी केली.उभारणीपासूनच कारखान्याने उत्कृष्ट नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रगती केली. शेतकर्‍यांना आजपर्यंत उत्तम दर दिला आहे.

आमदार मोहनराव कदम म्हणाले, सहकारी साखर कारखाना क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ  प्रतिवर्षी पुरस्कार देतो. सन 2017-18 या वर्षांत देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार कारखान्यास जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 10 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. 

यापूर्वी सोनहिरा कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता दक्षिण विभाग पुरस्कार, राज्य शासनाचा उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्कार मिळाले आहेत.ते म्हणाले, या पुरस्कारामध्ये कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.