Wed, Aug 21, 2019 14:58होमपेज › Sangli › सोनहिरा कारखान्यास डॉ. पतंगराव कदम यांचे नाव

सोनहिरा कारखान्यास डॉ. पतंगराव कदम यांचे नाव

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:45AMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास माजी मंत्री (स्व.)डॉ.पतंगराव कदम यांचे नाव देण्याचा ठराव कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत शनिवारी एकमताने मंजूर करण्यात आला .या ठरावानुसार आता ‘डॉ.पतंगराव कदम  सोनहिरा सहकारी साखर कारखाना,मोहनराव कदमनगर ,वांगी’  असे कारखान्याचे नामकरण करण्यात आले. तसेच   कारखाना परिसरात डॉ.कदम यांचे  भव्य  स्मारक व्हावे असा ठरावही सर्वानुमते मंजूर झाला.

विशेष सर्वसाधारण सभा आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाली.  कार्यकारी संचालक शरद कदम यांनी सभेचे नोटीस वाचन करून नाव देणे आणि स्मारक उभारणे असे दोन ठराव सभेपुढे मंजुरीसाठी सादर केले. कारखान्याचे सभासद  सुनील जगदाळे ,संभाजी मुळीक, शेखर कुलकर्णी,  सुनील पाटील  यांनी ठरवास अनुमोदन दिले.संचालक रघुनाथ कदम ,महेंद्र लाड , डॉ. जितेश कदम ,दीपक भोसले,आनंदराव मोहिते ,भीमराव मोहिते उपस्थित होते.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले,  डॉ.पतंगराव कदम यांनी सोनहिरा कारखान्याची उभारणी केली.  ताकारी व टेंभू योजनांच्या माध्यमातून हरितक्रांती केली.दुष्काळग्रस्त भागात त्यांनी पाणी आणले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले व कारखान्यास गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध झाला. ही सर्व किमया  शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या  डॉ. पतंगराव कदम यांनी केली. त्यांचे कारखाना परिसरात होणारे स्मारक शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल असेहीडॉ.विश्वजीत कदम यांनी सांगितले.

आमदार मोहनराव कदम म्हणाले, डॉ.पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याची उभारणी केली. त्यांनी सातत्याने  कारखान्याच्या   प्रगतीसाठी पाठपुरावा केला.कदम  कुटुंबाने राजकीय जीवनात अनेक सहकारी संस्था उभारल्या; परंतु कधी कुणाशी स्पर्धा केली नाही. आज त्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत.उत्कृष्ठ प्रशासन तसेच सभासद व शेतकर्‍यांच्या सहकार्याने  ‘सोनहिरा’  सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून नावारूपास आला आहे.   

कारखान्याचे संचालक पी. सी. जाधव यांनी प्रास्ताविक केले.संचालक निवृत्ती जगदाळे,बाबासो महिंद यांनी मनोगत व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, उपाध्यक्ष सयाजीराव धनवडे, पंढरीनाथ घाडगे, कारखान्यााचे सचिव अनिल कदम यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक युवराज कदम यांनी आभार मानले .