Wed, Nov 21, 2018 05:43होमपेज › Sangli › पेठच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

पेठच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 03 2017 11:54PM

बुकमार्क करा

नेेर्ले :वार्ताहर

वाळवा तालुक्यातील पेठ गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील बीसीएफचे सुभेदार दिनकर रामचंद्र कदम (वय 52) यांचे भारताच्या पश्‍चिम बांगला सीमेवर सेवेत असताना त्यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने  निधन झाले. रविवारी सकाळी शासकीय इतमामात मानवंदना देऊन पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पार्थिव गावात आल्यावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण गाव बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

दिनकर कदम हे गेल्या 22 वर्षांपासून देशाची सेवा  सीमेवर करीत होते. पश्‍चिम बंगाल येथील भारताच्या सरहद्दीवर त्यांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने कोलकात्ता येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कदम यांच्या मृत्यूची बातमी गावात समजताच गावावर शोककळा पसरली होती. 

कलकत्ता येथून त्यांचा मृतदेह रविवारी विमानाने कराड येथे आणला. तेथून गाडीने गावात आणला. यावेळी गावात लोकांनी एकच गर्दी केली होती.घरासमोर कदम यांची आई, पत्नी व मुलगी, मुलांनी एकच हबंरडा फोडला. गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील स्मशान भूमीत कदम यांना मानवंदना दिली. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सुभेदार बदलदेव दास, सुभेदार सत्यवीर सिंह यांनी तसेच सरपंच मीनाक्षी महाडिक, माजी सरपंच वैशाली पवार आदींनी  पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. 

पोलिसांनी व जवानांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. मुलाने भंडाग्णी दिली. यावेळी सम्राट महाडिक, हणमंतराव पाटील, अतुल पाटील, विजय पाटील, अरूण कदम, मोहन पाटील, संपतराव पाटील, अशितोष मदने, फिरोज ढगे, शंकर पाटील, हंबीरराव पाटील, प्रदिप पाटील, रोहित पाटील आदींनी श्रध्दांजली वाहिली. कदम यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगी, दोन मुले, असा परिवार आहे.