होमपेज › Sangli › पतंगरावांच्या समाजकारणाची बाजी

पतंगरावांच्या समाजकारणाची बाजी

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 8:14PMसांगली : खास प्रतिनिधी 

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने घेतलेली माघार, राष्ट्रवादी, शिवसेनेने दिलेला पाठिंबा हा खर्‍या अर्थाने पतंगराव कदम यांच्या समाजकारणाचा विजय आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील संघर्षाच्या राजकारणाला विधायक वळण मिळाले आहे. पुढील काळात बिनविरोधची ही प्रगल्भ परंपरा राज्याच्या राजकारणातही सुरू झाल्यास नवल वाटायला नको. 

सांगली जिल्ह्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. अनेक नेत्यांचा राजकीय संघर्ष वैयक्तीक पातळीवर आल्याची काही उदाहरणे आहेत. काहीजणांचा संघर्ष तर अगदी राड्यापर्यंत गेलेला आहे. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यातील टोकाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. मात्र या दोघांनीही कधी व्यक्तीगत सूड, द्वेषाची भावना बाळगली नाही. हे दोघेही विधायक कामाच्या कधी आडवे पडले नाहीत. उलट विधायक, विकास कामांसाठी त्यांच्यात स्पर्धा असायची. राजारामबापू यांच्या अकाली निधनानंतर दादांनी जयंत पाटील यांना साथ दिली. त्यांना विधानसभा निवडणुकीत  उभे करून राजकारणातील प्रवेश सुकर केला. प्रसंगी मार्ग दाखवून मदत केली. असाच संघर्ष पलूस-कडेगाव मतदारसंघात गेल्या काही वर्षांत पहावयास मिळाला. कदम-देशमुख घराण्यात प्रत्येक निवडणुकीत अटीतटीचा राजकीय संघर्ष झाला. यात बहुतांश वेळा पतंगराव कदम यांची सरशी झाली.मात्र या दोन गटांच्या इषेर्र्ने पलूस-कडेगाव मतदारसंघाचा विकास चांगला झाला. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दोन्ही गट अनेकवेळा आमने-सामने उभे ठाकले. पण दोन्ही गटांत राडा फारसा झालाच नाही. मतदारसंघातील दुष्काळाचा शिक्का कायमस्वरुपी पुसून काढण्यासाठी दोन्ही गटांनी विधायक राजकारण केले. ताकारी, टेंभू योजनेच्या माध्यमातून मतदारसंघ हिरवागार केला. साखर कारखाने, सूतगिरण्या काढल्याने शेती प्रगतशील झाली. अनेक शैक्षणिक संकुलामुळे मतदारसंघाची शैक्षणिक प्रगती मोठी झाली आहे. फी माफीचा लाभ मिळाल्याने हजारो विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता आले. रुग्णालये उभी करुन केवळ मतदारसंघातीलच नव्हे; तर जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा दिल्या. दादांच्या वेळी जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू जसा सांगलीत होता. तशी कदम यांनी राजकारणाला समाजकारणाची जोड दिल्याने गेल्याने 10-15 वर्षांत पलूस-कडेगाव हा भाग जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला.

डॉ. पतंगराव कदम यांनी राज्याचे राजकारण करताना कधीही कोणाचा द्वेष केला नाही. ‘निवडणूक संपताच राजकारण संपले, आता समाजकारण करायचे’ असे ते नेहमी म्हणत. कदम यांचे राज्य पातळीवरील नेतृत्व रोखण्यासाठी राज्यातील अनेकांनी देशमुख गटाला रसद पुरविली. पण पतंगराव यांनी ते विसरुन स्वपक्षातील व विरोधी पक्षांतील अनेक नेते मंडळींना मोठी मदत केली. भाजप नेत्यांशी त्यांचे नेहमी सलोख्याचे संबंध राहिले. 

शैक्षणिक व सहकार क्षेत्रात प्रचंड  काम उभे करुन स्वत:चे असे एक उत्तुंग स्थान निर्माण केले. कदम यांनी समाजकारणाचा वेगळा पायंडा पाडला.  त्यामुळे विरोधकांतही पतंगराव यांच्याबद्दल एक भावनिक नाते निर्माण झाले होते. कदम यांच्याबद्दल सर्वांनाच एक जिव्हाळा आणि  कृतज्ञतेची भावना होती. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे कडवे विरोधक कमी झाले. सर्वांशीच त्यांचा दोस्ताना वाढला. त्यामुळे अजातशत्रू व समाजकारणी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. 

त्यांची हीच पुण्याई या पोटनिवडणुकीत उपयोगी पडली. आज देशात आणि राज्यात भाजप व काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष आहे. या दोन्ही पक्षांतून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती असताना भाजपच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे विश्‍वजित कदम बिनविरोध निवडून येणे हे एक आश्‍चर्य मानले जात आहे. भाजपच्या प्रदेशस्तरावरील नेत्यांनी पक्षाच्या धोरणानुसार एखाद्या आमदारांचे निधन झाल्यानंतर त्याठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य निवडणूक लढविणार असेल तर तेथे उमेदवार न देण्याची भाजपची संस्कृती जपली आहे. देशमुख  घराण्यानेही एक पाऊल पुढे टाकत राजकीय प्रगल्भता दाखवत माघार घेतली आहे. पतंगराव कदम यांच्या समाजकारणाची ही बाजी आहे. जिल्ह्यातील संघर्षाच्या राजकारणाला विधायक वळण मिळाले आहे. राज्यातही हा पायंडा सुरू झाल्यास नवल वाटायला नको.