Thu, Apr 25, 2019 22:17होमपेज › Sangli › शेतकर्‍यांच्या खात्यावर अब तक १६५ कोटी

शेतकर्‍यांच्या खात्यावर अब तक १६५ कोटी

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:34AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे मंगळवारअखेर 64 हजार 105 शेतकर्‍यांच्या खात्यावर 165 कोटी रुपये वर्ग केले आहेत. जिल्हा बँकेला मंगळवारी प्रोत्साहन अनुदानाचे 36 कोटी रुपये आले आहेत. सुमारे 25 हजार शेतकर्‍यांची कर्जखाती निल झाली आहेत. 40 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान वर्ग झाले आहे. 

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यात तीन टप्प्यात 89 हजार 790 पात्र शेतकर्‍यांची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्हा बँकेच्या लॉगिनवर आली आहे. यामध्ये कर्जमाफीस पात्र दीड लाखांपर्यंतचे थकबाकीदार शेतकरी 24 हजार 160 आहेेत. त्यांच्या कर्जमाफीची रक्कम 89.68 कोटी रुपये आहे. 59 हजार 898 शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र आहेत. त्यांची रक्कम 90.91 कोटी रुपये आहे. ‘ओटीसएस’साठी 5 हजार 739 शेतकरी पात्र आहेत त्यांनी दीड लाखावरील रक्कम 31 मार्च 2018 पर्यंत भरल्यास 39.42 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. 

तीन टप्प्यातील यादीनुसार कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीस ओटीएस लाभाची रक्कम 220 कोटी रुपये आहे. त्यापैकी जिल्हा बँकेला 177 कोटी 38 लाख रुपये मिळाले आहेत. त्यापैकी मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 60 हजार 668 शेतकर्‍यांचे 138 कोटी रुपये जिल्हा बँकेने वर्ग केले आहेत. जिल्हा बँक मुख्यालय व शाखा स्तरावर रात्री उशिरापर्यंत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरू होते. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर कर्जमाफी अंमलबजावणीबाबत सतत देखरेख ठेवून आहेत. 

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र-अपात्रचे निकष शासनाने ठरवून दिलेले आहेत. पात्र शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन शासनाने केले होते. आता कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होऊ लागली आहे. दरम्यान 5 शेतकर्‍यांनी कर्जमाफीचा लाभ नको असल्याचे कळविले आहे. अपात्रतेमुळे कारवाईच्या धसक्याने लाभ नाकारल्याचे स्पष्ट होत आहे.