Tue, Jun 25, 2019 15:49होमपेज › Sangli › जिल्ह्यात दारूची वाढती तस्करी!

जिल्ह्यात दारूची वाढती तस्करी!

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 10:13PMसांगली : अभिजित बसुगडे

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता लागून आठ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्कने आतापर्यंत या निवडणुकीची कोणतीही तयारी केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बनावट दारूची तस्करी वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तस्कर सक्रीय झाले असून ढाबे, हॉटेलमध्ये सर्रास दारूची विक्री सुरू झाली आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अजूनही स्वस्थ आहे. आचारसंहिता सुरू होऊन आठ दिवस झाले तरी या विभागाने अद्यापपर्यंत तपासणी नाके उभे केलेले नाहीत. त्याशिवाय ढाबे, हॉटेल येथेही जुजबी तपासणी केल्याचेच चित्र आहे. निवडणूक काळात मतदार, कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा केला जातो अशा तक्रारी होतात. त्याशिवाय जेवणावळीही घातल्या जातात अशा तक्रारी होतात. आचारसंहिता लागल्यापासून जेवणावळीसह ओल्या पार्ट्यांना ऊत आला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर परिसरात असणारे ढाबे, हॉटेल्स फुल्ल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परवाना नसताना अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर दारूची विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र त्यावर कारवाई होताना मात्र दिसत नाही. 

विविध पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींचे आयोजन केले होते. यानंतर उमेदवारी निश्‍चीत होणार आहे. यापुढे या ओल्या पार्ट्यांची संख्याही वाढणार आहे. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्ककडून अद्याप कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही.  बनावट दारूबद्दलही  तातडीने खबरदारी घेण्याची गरज आहे. यावेळी बनावट दारूच्या तस्करीसह हुबळी, गोवा मेड दारूची तस्करी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सध्या तरी परवाना नसलेले हॉटेल, ढाबे म्हणजे मद्यपींचे अड्डे बनल्याचे चित्र आहे. तेथेच इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या जेवणावळी सुरू आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याआधी उत्पादन शुल्कने कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

तीन पदे रिक्त, कर्मचारी नाक्यांवर...

राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक, सांगली शहरचे निरीक्षक तसेच मुख्यालयातील उपअधीक्षक अशी तीन महत्वाची पदे सध्या रिक्त आहेत. यातील उपअधीक्षक पदाचा कार्यभार एका प्रशिक्षणार्थीकडे सोपवण्यात आला आहे. तर सांगली शहर आणि भरारी पथकाचा कार्यभार कोल्हापुरातील निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्ककडे सांगली, मिरज, कुपवाडमध्ये कारवाई करण्यासाठी, तपासणी नाके उभारण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच उपलब्ध नाहीत.

अधिकारी, कर्मचारी गोवा बॉर्डरवर...

गोव्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक होऊ नये यासाठी बॉर्डरवर राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी, कर्मचारी नेमले जातात. यासाठी मिरजेचे निरीक्षक आणि त्यांच्या पथकाची रविवारपासून गगनबावड्याला नियुक्ती करण्यात आली आहे. तर विट्याच्या निरीक्षकांची तेथेच 6 जुलै ते 10 जुलैपर्यंत नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील पाच दिवसांसाठी इस्लामपूरच्या निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढील दहा दिवसांसाठी सांगलीतील अतिरिक्त निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात मात्र कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही.