Wed, Nov 21, 2018 20:08होमपेज › Sangli › पेठनाक्यानजीक वाघाचे कातडे जप्त 

पेठनाक्यानजीक वाघाचे कातडे जप्त 

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:22AMइस्लामपूर : शहर वार्ताहर 

इस्लामपूर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री  पेठनाका येथे सापळा रचून  80 हजार रुपये किमतीचे वाघाचे कातडे जप्‍त केले. याप्रकरणी वन्यजीव संरक्षक कायद्याअंतर्गत कराड तालुक्यातील दोघांना  अटक केली आहे. त्यांनी हे कातडे विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभव सुरेश झांजे (वय 19 रा. रिसवड), अक्षय मोहन गिरी (रा. चिखली ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी त्यांना न्यायालयाने एक दिवसाची  पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांना खबर्‍यामार्फत पेठनाका येथे वाघाचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला. मंगळवारी रात्री दहा वाजता मोटारसायकल (एम.एच.50 बी.5171) वरून वैभव, अक्षय हे संशयितरित्या फिरताना पथकाला आढळले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वाघाचे कातडे सापडले. 

पोलिसांनी त्यांच्याकडून वाघाचे कातडे, 20 हजार रूपये किंमतीची  मोटरसायकल, 8 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल, रोख 5 हजार रूपये असा एकूण  1 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल  जप्‍त केला. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक विश्‍वास साळोखे, पोलिस प्रकाश पवार, संपत वारके, हिंदूराव पाटील, शरद जाधव, अमोल माळी, यशवंत कोळी, अमोल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.