होमपेज › Sangli › सहा हजार गावे दुष्काळमुक्‍त करणार : मुख्यमंत्री 

सहा हजार गावे दुष्काळमुक्‍त करणार : मुख्यमंत्री 

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 10:22PMयेळवी : वार्ताहर

जलसंधारणात लोकसहभाग आणि त्यातून उभी राहिलेली चळवळ या माध्यमातून राज्यात यावर्षी सहा हजार गावे दुष्काळमुक्‍त करणार आहे. गतवर्षी 11 हजार गावांनी जलयुक्‍त शिवार, वॉटर कप स्पर्धा या माध्यमातून दुष्काळमुक्‍तीचा संकल्प केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

आवंढी, बागलवाडी (ता. जत)  येथे ‘सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा’ पाणी फाऊंडेशनच्या कामाची शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे काम पन्‍नास वर्षांत झाले नाही, ते पाणी फाऊंडेशन व जलयुक्‍त शिवार या योजनेतून एका वर्षात करून दाखविले आहे. अनेकदा लोकांना वाटते की, नाले किंवा नद्या यांचे खोलीकरण केल्यास पाणी थांबते; परंतु त्यावर विसंबून न राहता पाणी पडते कुठे, जाते कुठे व ते जमिनीत मुरवावे कसे, याचे संपूर्ण शास्त्र समजावून घेणे महत्त्वाचे होते. निसर्गाने तयार केलेली पाण्याची वाट ती निसर्गाला परत करणे, पाणी जमिनीत मुरविणे म्हणजे जलसंधारण.

मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांचा श्रमदानात सहभाग 

मुख्यमंत्री  फडणीस यांनी आवंढी व बागलवाडीत सकाळी पोहोचताच थेट श्रमदानात सहभाग घेतला. श्रमदान करणार्‍यांशी संवाद साधला. या कामावर कधीपासून काम करता? पाणी फाऊंडेशनचा उद्देश काय, असे प्रश्‍न त्यांनी विचारले. वयोवृद्ध महिला श्रमदान करत होत्या. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी स्वतः श्रमदानात सहभाग नोंदवला.