Sat, Jul 20, 2019 08:48होमपेज › Sangli › ‘हा मुलगा माझा नाहीच,त्याला मारून टाक; नाही तर..’

‘हा मुलगा माझा नाहीच,त्याला मारून टाक; नाही तर..’

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 28 2018 1:12AMतासगाव : शहर प्रतिनिधी

विसापूर (ता. तासगाव) येथील आर्यन अर्जुन चव्हाण या सहा महिन्यांच्या बालकाचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याचे  पोलिस तपासात स्पष्ट झाले. आर्यनचे वडील अर्जुन (वय 27), आजोबा भगवान (65) आणि आजी आनंदी चव्हाण (55, सर्व रा. जिरवळ मळा, विसापूर) यांच्या दबाव आणि सततच्या जाचामुळेच आर्यनचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याची आई सुनीता  चव्हाण (22) हिने दिली आहे.

वडील अर्जुन व आजोबा भगवान यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. आई सुनीता व आजी आनंदी यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे प्रभारी पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांनी सांगितले.

पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सुनीता आणि अर्जुन यांचा दि.25 जानेवारी 2016 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस दोघांचा संसार सुरळित सुरू होता. दोन महिन्यानंतर सुनिता  गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्या पतीसह, सासू, सासर्‍यांनी सुनिताला ‘हे मूल आमचे नाही’, असे म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली.पाचव्या महिन्यात सासूने गर्भपात करावा, यासाठी पोटावर ढकलून दिले. सातव्या महिन्यात सुनिता माहेरी गेली. 

दि.2 सप्टेंबर 2017 रोजी आर्यनचा जन्म झाला. मुलगा झाल्यानंतर तरी आता संसार सुखाचा होईल, या अपेक्षेने सुनिता दोन महिन्यानंतर पुन्हा सासरी विसापूर येथे आली. मात्र ‘आर्यनचा रंग गोरा आहे, आणि माझा सावळा’, असे म्हणून अर्जुनने तिला पुन्हा मारहाण करण्यास सुरूवात केली. आर्यनच्या जन्मापासून त्याला अर्जुनने एकदाही त्याला जवळ घेतले नाही.

सुनिताने दिलेल्या कबुली जबाबात असेही म्हटले आहे, की नवरा, सासू, सासरा, नणंद  तिला  नेहमी उपाशी ठेवत. पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे भांडे ठेवले होते. सर्व जेवण करीत असताना त्याठिकाणी  तिला थांबू दिले जायचे नाही. घरात म्हशीचे दूध असायचे. मात्र  आर्यनाला शेळीचे दूध दिले जायचे. त्याला त्रास व्हावा यासाठी हे दूध मुद्दाम फ्रीजमध्ये अतिशय थंड करुन पाजले जायचे.

‘हा मुलगा माझा नाहीच. त्याला मारून टाक. नाही तर तुला, तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन’  अशी धमकी अर्जुने दिली होती.आजोबा भगवान चव्हाण यानेही आर्यनला काही दिवसांपूर्वी पाय धरून उलटे धरुन डोक्यावर पाडण्याचा प्रयत्न केला होता असे तिने कबुली जबाबात म्हटले आहे.  

नवरा आणि सासूने ‘आर्यनचे काय करणार सांग’, असा प्रश्न विचारला. तसेच ‘आर्यनला तुझे तू संपवायचे, आम्ही कोणी घरी थांबणार नाही. नाही तर तुला पंख्याला लटकावतो’, अशी धमकी देऊन वायरही गळ्यात अडकवली होती. त्यावेळी ‘सुनिताने आपल्याला काही वेळा हवा आहे’, असे सांगितले होते.

दि. 25 फेब्रुवारीला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सासू आनंदी, सासरा भगवान, नणंद उषा,दुसरी नणंद सुषमा आणि तिचे पती प्रवीण जाधव हे सर्वजण पुणदी येथील पाहुण्यांकडे गेले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवरा अर्जुन घरी आला. त्याने ‘तुला आज शेवटची संधी आहे. आज सगळे घराबाहेर गेलेत. आज आर्यनला मारुन टाक, नाहीतर आज तुझा शेवट आहे’ असे धमकावले.

यानंतर सुनिताने घाबरून आर्यनच्या गळ्याला हात घातला. मात्र गळा दाबला नाही.  त्यामुळे अर्जुनने ‘आता मी पहिल्यांदा तुलाच संपवतो’ असे म्हणून सुनीताला मारहाण सुरू केली. आता तो आपल्याला, आर्यनला आणि आपल्या आईवडिलांना मारुन टाकेल, अशी भिती वाटून तिने अखेर बाळाचा  गळा दाबून खून केला.

आर्यनचा खून केल्यानंतर अर्जुनने सुनिताला त्याचा मृतदेह पाळण्यात ठेवण्यास सांगितले. काही वेळानंतर सासू, सासरे घरी आले. झालेला प्रकार त्यांना सांगितला. कोणासही न सांगता आर्यनचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगून अंत्यविधी करण्याचे ठरले होते. मात्र शेजारच्या कोणीतरी सुनिताचे वडील दिनकर रामचंद्र तांबवेकर (रा.  दुधोंडी, ता. पलूस) यांना फोनवरुन आर्यनचा मृत्यू  झाल्याची माहिती दिली. 

तांबवेकर यांनी सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तासगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची फिर्याद दिली. मात्र त्यांनी संशयास्पद मृत्यू असून शवविच्छेदन करावे, अशी मागणीही केली.

दरम्यान तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे केलेल्या शवविच्छेदनात आर्यनचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.सुनिता हिनेच खून केला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र आर्यनच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली नसल्याने पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनीच खुनाबद्दल आई सुनिता, वडील अर्जुन, आजोबा भगवान आणि आजी आनंदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, हवालदार सचिन घाटगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र थोरावडे, बी. एस. तिटकरे, हवालदार डामसे यांनी या प्रकरणाचा  तपास केला.