Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सहा लाख टनाची ‘कचरा कोंडी’

सहा लाख टनाची ‘कचरा कोंडी’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : अमृत चौगुले

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत गेल्या कित्येक वर्षांतील 6 लाख टनाहून अधिक कचरा पडून आहे. त्यात दररोज तीन शहरातून तब्बल 200 टनाची भर पडत आहे. लोकप्रतिनिधी, कारभारी आणि प्रशासनानेही याच्या नियोजनाबाबत गांभीर्याने घेतले नाही. अखेर हरित न्यायालयाने याबाबत बडगा उगारला. त्यानुसार 40 कोटी रुपयेही घनकचरा प्रकल्पासाठी स्वतंत्र ठेवण्यात आले. पण दोन-अडीच वर्षे उलटूनही अद्याप प्रकल्प कागदावर आणि अंमलबजावणीची कासवगती आहे. त्यामुळे कचरा निर्मूलनासाठी ठोस पावले न उचलल्यास भविष्यात महानगरांप्रमाणेच येथे ‘कचरायुद्ध’ पेटण्याची शक्यता आहे. 

तब्बल 118 चौरस किलोमीटर विस्तार असलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात रोज तब्बल दोनशे टनावर कचरा उठाव होतो. अपुर्‍या यंत्रणेमार्फत त्यातील केवळ 160 टनावरच कचरा उचलला जातो. उर्वरित कचरा अद्याप रस्त्यावर, गटारी, नाल्यांत पडतो. यामध्ये सर्वच प्रकारचा कचरा समाविष्ट आहे. दररोज गोळा केलेला 100 टनाहून अधिक सांगली, कुपवाडमधील कचरा समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोत, तर मिरजेतील 70 टनाहून अधिक कचरा बेडग  रस्ता येथे टाकला जातो.

यावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन आणि आहेत्या कचरा निर्मूलनाची गरज आहे. यासाठी प्रशासन, कारभार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने सांगली जिल्हा सुधार  समितीने हरित न्यायालयात धाव  घेतली. त्याद्वारे घनकचरा प्रकल्पाचा कागदावरतरी मुहूर्त लागला. त्यातून 40 कोटी रुपयांची सक्तीची तरतूद करून बँकेत खात्यावर पैसेही जमा आहेत. परंतु त्या प्रकल्पाचाही खेळखंडोबा सुरू आहे. यातून कचरा प्रकल्प अंमलात आणण्याऐवजी त्यावर हात कसा मारता येईल, हाच खेळ सुरू आहे.

कचरा व्यवस्थापन आणि कचरा निूर्मलनासाठी जागतिक पातळीवर काम करणार्‍या अनेक कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून महापालिकेने संपर्कही साधण्यात आला. कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्प पाहणीसाठी दौरेही झाले. पण त्यातून कोणता प्रकल्प करायचा, हे मात्र अद्याप निश्‍चित होऊ शकले नाही. उलट एकमत होण्याऐवजी अडवाअडवीच सुरू आहे.

एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्पर्धेसाठी तात्पुरती मलमपट्टी आणि त्यातून यशाची नौटंकी सुरू आहे. पण घरातूनच कचरा वर्गीकरण, ओला-सुका कचर्‍याचे संकलन आणि त्यातून त्याचा खतासह विविध कारणांसाठी उपाययोजना करण्यासारखे अनेक पर्याय आहेत. त्याबाबत  कोणत्याही उपाययोजना नाहीत. 

आहे तो सहा लाख टनांवर कचरा एकदा संपवायचा, भविष्यात होणार्‍या कचर्‍याचे निर्मूलन करायचे याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासन कोणताच निर्णय घ्यायला तयार नाहीत. उलट आहेत  त्या 70-80 एकर जागांवर कचर्‍याचे ढीग रोज वाढतच आहेत.  भविष्यात या कचर्‍याच्या डेपोंमुळे मोकाट कुत्री, तसेच दुर्गंधीचा प्रश्‍न अधिक गंभीर बनत जाणार आहे.त्यामुळे  या गावांनी कचरा टाकण्यास मज्जावाची भूमिका घेतली. तर पुन्हा कचराही शहरातील मोठी समस्या बनू शकते.


  •