Fri, Jul 19, 2019 13:26होमपेज › Sangli › गळके छत, अंगणात चिखल, झुडुपांचा वेढा

गळके छत, अंगणात चिखल, झुडुपांचा वेढा

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 10:16PMसांगली : अभिजित बसुगडे

गळके छत, दारात दलदल, झुडुपांचे साम्राज्य, सरपटणार्‍या प्राण्यांचे भय अशा अवस्थेत सांगलीतील पोलिस आणि त्यांचे कुटुंबीय रहात आहेत. स्टेशन चौकातील पोलिस वसाहतीच्या दुरवस्थेची दखल कोण घेणार, असा प्रश्‍न आहे. शौचालयांचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था आणि रामभरोसे असणारी सुरक्षितता अशा परिस्थितीत पोलिस कुटुंबियांना दिवस काढावे लागत आहेत. या वसाहतीची तातडीने दुरूस्ती होण्याची गरज आहे. 

सांगली शहरात स्टेशन चौक, रिसाला रस्ता, विश्रामबाग येथे पोलिस वसाहती आहेत. स्टेशन चौकाच्या मानाने रिसाला रस्ता, विश्रामबागमधील वसाहतींची अवस्था बरी आहे. मात्र स्टेशन चौकातील वसाहतीतील पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. सातत्याने ड्रेनेजचे तुंबणारे पाणी घरात घुसतेच. शिवाय पावसाळ्यात वसाहतीच्या पिछाडीला असणार्‍या मैदानात साचणार्‍या पाण्यातूनच येथील रहिवाशांना वाट काढावी लागते. 

या वसाहतीत प्रत्येक दहा खोल्यांमागे दोन शौचालये आहेत. एक पुरूषांसाठी तर एक महिलांसाठी. केंद्र सरकार घरोघरी शौचालये बांधण्यासाठी प्रयत्नशील असताना सांगलीतील या पोलिस वसाहतीत मात्र सार्वजनिक शौचालयांचा वापर रहिवाशांना करावा लागतो. त्यांचीही दुरवस्था आहे. खासगी भाड्याची घरे परवडत नाहीत, शिवाय अन्य पोलिस वसाहतीत घरे मिळत नसल्याने येथील पोलिसांवर आहे त्या परिस्थितीत राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

या वसाहतीतील रस्त्यांचीही दुरवस्था आहे. हा परिसर सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित येत असल्याचे सांगून महापालिका प्रशासनाकडून या भागात रस्ते करण्यास टाळाटाळ केली जाते. शिवाय बांधकाम विभागाकडूनही येथे रस्ते करण्यात आलेले नाहीत.  येथील पोलिस कुटुंबियांनी नगरसेवकांसह राजवाडा चौकात दोन वर्षांपूर्वी आंदोलनही केले होते. तरीही येथील रहिवाशांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. 

पोलिसांचीच घरे असुरक्षित

या वसाहतीला केवळ तारेचे कंपाऊंड आहे. शिवाय तेही जुनाट आहे. त्यामुळे या वसाहतीला सुरक्षा नसल्याचेच दिसून येते. नागरिकांचे संरक्षण करणार्‍या पोलिसांच्या या वसाहतीत भुरट्या चोर्‍या नित्याच्याच झाल्या आहेत. दारात वाळत घातलेले कपडे, चुकून बाहेर राहिलेल्या वस्तू चोरट्यांकडून वारंवार लंपास केल्या जातात. दाद कोणाकडे मागायची, असाही प्रश्‍न येथील रहिवाशांसमोर आहे. 

सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर

या परिसरात दलदल आणि झुडुपांचा त्रास बारा महिने होत असतो. अस्वच्छतेच्या अभावामुळे साप, सरडे, पाली यासह सरपटणारे प्राणी येथे हमखास आढळून येतात. त्याशिवाय उंदीर, घुशींनी भिंती पोखरल्या आहेत.अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. साथीच्या आजारांमुळे अनेकांना रुग्णालयाच्या वार्‍या कराव्या लागत आहेत. 
या वसाहतीची दुरूस्ती करावी अथवा येथील पोलिसांच्या कुटुंबाचे दुसरीकडे पुनर्वसन करावे, अशी  मागणी आहे. 


अन्य कार्यालयांनाही फटका...

या परिसरात सांगली ग्रामीण पोलिस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्तचर विभाग अशी पोलिसांचीच कार्यालये आहेत. येथील असुविधांचा त्यांनाही फटका बसत आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुचाकीवरूनही या रस्त्यावरून जाणे अशक्य बनले आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे असून चिखलाचे साम्राज्य आहे. पावसाळ्यात या चिखलातून वाट काढून पोलिस आणि अभ्यागतांना जावे लागत आहे. 

उपअधीक्षक कार्यालयात ड्रेनेजचे पाणी...

राजवाडा चौकात पावसाने, ड्रेनेज तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यावेळी ड्रेनेजचे बॅक वॉटर या पोलिस वसाहतीसह वसाहतीला लागूनच असणार्‍या पोलिस उपअधीक्षक कार्यालयातही शिरते. ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे या कार्यालयातील कर्मचार्‍यांना काम करताना अडचणी येत आहेत. महिन्यातून दोन ते तीनवेळा ड्रेनेज तुंबते. पोलिस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही याचा फटका बसत असला तरी यावर कायमस्वरूपी तोडगा अद्यापही काढण्यात आलेला नाही. 

निवासस्थानांचा प्रस्ताव मंजूर पण...

तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी विश्रामबाग पोलिस वसाहतीत सुमारे साडेचारशे घरकुलांचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. त्यातील काही घरकुलांना शासनाची परवानगीही मिळाली आहे. मात्र त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या घरकुलाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून पोलिस निवासस्थानांचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, अशी मागणी पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.