Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Sangli › अ‍ॅड. बी.एस. पाटील जीवनाचे सार जाणणारे अंतर्यामी

अ‍ॅड. बी.एस. पाटील जीवनाचे सार जाणणारे अंतर्यामी

Published On: Dec 17 2017 12:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:21AM

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

माजी खासदार एस. डी. पाटील यांची  परंपरा  चालविण्याचे काम त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. बी. एस. पाटील करीत आहेत. त्यांना जीवनाचे खरे सार कळले आहे, म्हणूनच ते अंतर्यामी झाले आहेत, असे गौरवोद‍्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले.

वाळवा शिक्षण संस्थेचे मानद सचिव अ‍ॅड. बी.एस. पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात राज्यपाल पाटील बोलत होते. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील प्रमुख उपस्थित होते. आमदार जयंत पाटील स्वागताध्यक्ष होते. 

अ‍ॅड.  पाटील व त्यांच्या पत्नी प्रा. सौ. अरुणादेवी पाटील यांचा सत्कार  करण्यात आला.  गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. अ‍ॅड. पाटील यांच्या जीवनावरील आधारित चित्रफित दाखविण्यात आली. चारुदत्त जोशी यांनी मानपत्र वाचन केले. 

राज्यपाल पाटील म्हणाले, अहंकाराने माणूस बुडतो. तर ज्ञानाने तो वाढतो. मोठ्यांच्या सावलीत अ‍ॅड. पाटील यांच्यासारखी माणसे घुसमटली नाहीत तर ती वाढली. खा. एस. डी. पाटील यांच्या संस्कारात अ‍ॅड. पाटील वाढले. त्यांनी सुरूवातीपासून घेतलेले व्रत आजही सोडलेले नाही. 

डॉ. डी.वाय. पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील  व  एस.डी. पाटील यांच्यामुळे वाळवा तालुका सुसंस्कृत झाला. अ‍ॅड. पाटील यांनी  खा. पाटील यांचा वसा यशस्वीपणे पुढे चालविला आहे. सत्काराला उत्तर देताना अ‍ॅड. पाटील म्हणाले, वडिलांचे संस्कार घेऊन मी पुढे आलो. स्व. वसंतदादांच्या सल्ल्यामुळे मी राजकारणात पडलो नाही. कोणत्याही सत्तेचा मोह न करता मी संस्थेचा विकास केला. लोकनेते राजारामबापू व  जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून आजपर्यंत काम करीत आलो. 

अण्णासाहेब डांगे म्हणाले, एस.डी. पाटील यांंचा वारसा बी.एस. पाटील यांना मिळायला पाहिजे होता. पण पक्षाने त्यांना डावलले. त्याचे शल्य काय असते हे त्यांनाच माहीत. त्यामुळे कुचंबणा होऊनही सर्वार्थाने समाधानी असलेले त्यांचे व्यक्तीमत्त्व  आहे.

जयंत पाटील म्हणाले, अ‍ॅड. पाटील यांचे व्यक्तीमत्त्व मी 35 वर्षांपासून पाहत  आहे. राजकारणापेक्षा त्यांच्यातील कलाकार भारी ठरत गेला. समाजाला मार्गदर्शन करणारे प्रतिभावंत नेते म्हणून आम्ही आपुलकीने त्यांच्याकडे पाहतो. 

संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शहा, उपाध्यक्ष सखाराम जाधव, वैभव पाटील, पृथ्वीराज पाटील, सारंग पाटील आदी उपस्थित होते. सुमेधा दातार यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सहसचिव  अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी आभार मानले.