Mon, Jun 24, 2019 17:30होमपेज › Sangli › कुणाला शिट्टी, पतंग, टेबल अन् मेणबत्तीही

कुणाला शिट्टी, पतंग, टेबल अन् मेणबत्तीही

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 19 2018 12:04AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत अनेक  प्रभागांत सर्वपक्षीयांबरोबरच अपक्षांच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत.  बुधवारी निवडणूक अधिकार्‍यांनी अपक्षांना चिन्हे वाटप केली. यामध्ये  शिट्टी, पतंग, रोडरोलर, टेबल, मेणबत्ती, नगारा अशा चिन्हांचा समावेश आहे. तब्बल 215 अपक्ष मैदानात आहेत. त्यामुळे त्यांच्या चिन्हांसह प्रचाराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

महापालिकेतील 78 भावी नगरसेवकांच्या निवडीसाठी महापालिकेचे मैदान आता  रंगले आहे. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी, बहुजन समाज पार्टी आदींसह विविध पक्ष मैदानात आहेत. यासोबतच अपक्षांनीही बंडखोरी करीत जोरदार शड्डू ठोकला आहे. त्यांनीही अपक्ष विकास महाआघाडीच्या माध्यमातून पॅनेल उभे केले आहे. त्यांनी सर्वांसाठी एकच चिन्ह मागितले होते. पण निवडणूकपूर्व नोंदणी नसल्याने त्यांना एक चिन्ह मिळाले नाही.सर्वच पक्षांचे तब्बल 236 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना त्यांच्या पक्षानुसार अधिकृत चिन्हे आधीच निश्‍चित आहेत. पण अपक्षांना आज चिन्हेवाटप करण्यात आली. सांगलीतील तीन, मिरजेतील दोन आणि कुपवाडमधील एका निवडणूक केंद्रांमध्ये हे चिन्हेवाटप करण्यात आले. यावेळी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. आता चिन्हेवाटप झाल्याने उमेदवारांना चिन्हांसह प्रचार करण्यास मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला गती येणार आहे. 

आरसीएच सेंटर केंद्रात चिन्हे वाटपावेळी गोंधळ

सर्वच केंद्रांमध्ये उमेदवारांना चिठ्ठ्या टाकून चिन्हेवाटप करण्यात आली. यामध्ये सांगलीतील आरसीएच सेंटर केंद्रातही अशाच पद्धतीने चिन्हेवाटप झाले. परंतु एका उमेदवाराला एक चिन्ह  देण्यात आले. परंतु त्याने ते बदलून मागितले. ते बदलूनही देण्यात आले. परंतु पुन्हा दुसर्‍या उमेदवाराला पुन्हा तेच चिन्ह गेल्यानंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला. परंतु निवडणूक अधिकार्‍यांनी तत्काळ त्यात सुधारणा करीत चिन्हेवाटपाचा वाद निकाली काढला. त्यामुळे नंतर चिन्हेवाटप सुरळीत पार पडले.