Wed, Apr 24, 2019 19:45होमपेज › Sangli › शेती-दूध उत्पादन व्यवसायात घाटाच!

शेती-दूध उत्पादन व्यवसायात घाटाच!

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 11 2018 10:15PMइस्लामपूर : मारूती पाटील

भाजीपाला, शेतीमालाला दर नसल्याने शेती तोट्यात चालली आहे. त्यातच आता दुधाचे दरही खाली येवू लागले आहेत. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेल्या ग्रामीण  तरुणांना आता कोणता व्यवसाय निवडावा, असा प्रश्‍न पडला आहे.

अलिकडच्या काही काळात नोकरी मिळत नसल्याने अनेक पदवीधर तरूण नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीत आधुनिक तंत्राचा वापर करीत अनेक युवा शेतकर्‍यांनी भाजीपाला व उसाचे विक्रमी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातून अनेक कुटुंबांची आर्थिक घडी बसत चालली आहे. मात्र गेल्या वर्ष-दोन वर्षापासून शेतीमालाला अपेक्षित भाव मिळताना दिसत नाही. भाजीपाल्याचीही तीच अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतीत घातलेला पैसाही निघत नाही. विक्रमी उत्पादन घेऊनही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती तोट्यातच जावू लागली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक तरूण दूध व्यवसायाकडेही वळले आहेत. 

आज ग्रामीण भागात ठिकठिकाणी  गाई व म्हशींचे गोठे उभा राहू लागले आहेत. सोबतीलाच कुक्कुटपालन व शेळीपालनाचाही व्यवसाय अनेकांनी सुरू केला आहे. मात्र या व्यवसायावर अवलंबून असणारे व्यापारी, दूध संस्था, दूध संघवाले गडगंज झाले. उत्पादकांच्या हाती मात्र काहीच शिल्‍लक रहात नसल्याचे वास्तव आहे.  पशुखाद्याचे  दर वाढत असताना दुसरीकडे दुधाचे दर मात्र झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे दूध व्यवसायही तोट्यात चालला आहे. अनेकांनी कर्जे काढून या व्यवसायात पैसा गुंतविला आहे. त्या कर्जाचे हप्‍तेही फिटेनासे झाले आहेत.