Sun, May 26, 2019 01:02होमपेज › Sangli › महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ

महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 18 2018 12:21AMश्रवणबेळगोळ : सुनील पाटील

श्रवणबेळगोळ येथे भगवान श्री बाहुबली गोमटेश्‍वर भगवंतांच्या 88 व्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. श्री गोमटेश्‍वर भगवान की जयच्या जयघोषात सोहळा सुरू होता.

प्रथम कलश घेणारे राजस्थान येथील पटणी परिवार यांनी 11 कोटी 61 लाख रुपयांचा मानाचा कलश घेतला होता. ही पूर्ण रक्कम श्रवणबेळगोळ येथे उभारण्यात येणार्‍या 200 बेडच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकरिता वापरण्यात येणार आहे, अशी घोषणा प.पू. स्वतिश्री चारूकिर्ती भट्टारक स्वामीजींनी केली. 

दुपारी सव्वा वाजता महामस्तकाभिषेकाच्या सोहळ्याला धार्मिक विधीने प्रारंभ झाला. आचार्य वर्धमानसागर महाराज, आचार्य पुष्पदंत महाराज यांनी महामस्तकाभिषेकासाठी शुभेच्छा व आशिर्वचन दिले. दोन्ही आचार्यांनी चारुकिर्ती भट्टारक महास्वामीजींना अविरत सुरू असलेल्या कार्याला आशीर्वाद दिले. तद्नंतर पटणी परिवाराने भगवान बाहुबलींच्या मस्तकावर जलाभिषेक करून महामस्तकाभिषेकास सुरुवात केली. लाखो भाविकांच्या साक्षीने व प्रसार माध्यमातून विश्‍वभर हा समारंभ असंख्य लोकांनी पाहिला. 

गेल्या तीन वर्षांपासून अधिक काळ या महामस्तकाभिषेक सोहळ्याची तयारी सुरू होती. भगवान बाहुबलींच्या मस्तकावरून जल, नारळ, दूध, केसर, तांदळाचे पीठ, इक्षू (ऊस रस), हळद, श्रीगंध, चंदन, अष्टगंध आणि चांदी-सोन्याची फुले, रत्न आदींनी अभिषेक केला. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. हे दृश्य न भुतो न भविष्यती असे होते. भावनिक आनंद देणारे होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महामहोत्सवास उपस्थित राहून  पत्नीसोबत जलाभिषेक केला. राज्यमंत्री ए. मंजू, डॉ. वीरेंद्र हेगडे, जिल्हाधिकारी रोहिणी सिंदूर अन्य मान्यवरांनी कलशाभिषेक केला. सिंदूर व उपजिल्हाधिकारी वरद रेड्डी पहाटेपासून कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित होते. 

भगवान बाहुबली मूर्तींच्या पुढे चांदीच्या 108 कलशांची मांडणी केली होती. मध्यभागी चांदीचा मोठा कलश गव्हावर ठेवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी 400 आचार्य, त्यागीगण, आर्यिका यांच्या उपस्थितीत प्रारंभी त्यागींचे नामोल्लेख करून त्यांच्या उपस्थितीबद्दल ऋण व्यक्त केले. दुपारी सुरू झालेल्या अभिषेक सोहळ्याची सायंकाळी पुष्पवृष्टीने सांगता झाली. 

दर्शनासाठी भाविकांना सातनंतर सोडण्यात आले. देश-विदेशातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध वाद्यांच्या आणि  संगीताच्या गजरात मंत्रमुग्ध होऊन  भाविक सोहळा पाहत  होते. कडक उन्हाचा कोणताही त्रास भाविकांना होणार नाही, अशी सुसज्ज यंत्रणा तयार केली होती. 

भाविकांना त्रासाविना दर्शन व्हावे यासाठी सन्मती संस्कार मंच, वीर सेवा दल, चंदाबाबा ग्रुप, भारत स्काऊट गाईड, वीर महिला मंडळ स्वयंसेवक, संघटक, युवक, युवती सकाळपासून सेवा देत होते. नियमाप्रमाणे यंत्रणा चोख काम करीत होती असे महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, अशोक सकळे, वसंत पाटील, अनिल पाटील यांनी सांगितले. चंद्रगिरी  भाविकांना सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन संस्थेच्या वतीने सरबताचे वाटप करण्यात आले. 

आरोग्य शिबीराची व्यवस्था...

आरोग्य विभागाच्यावतीने भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी वेगवेगळ्या  ठिकाणी सोय केली आहे.रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पेयजलाची व्यवस्था केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेर्‍याची व्यवस्था केली आहे. 

लाखो भाविक  नतमस्तक...

श्रवणबेळगोळ येथे प्रत्येक बारा वर्षांनी महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त जैन समाजाचा कुंभमेळा भरतो. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून लाखो लोक येतात. आजही लाखो भाविक हजेरी लावून गोमटेश्‍वर भगवान की जयच्या जयघोषात भगवंताच्या  चरणी नतमस्तक झाले.