Sun, Mar 24, 2019 04:45होमपेज › Sangli › शोरूमचा कर्मचारी असल्याचे भासवून सव्वादोन लाख लंपास

शोरूमचा कर्मचारी असल्याचे भासवून सव्वादोन लाख लंपास

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 13 2018 12:15AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील माधवनगर रस्त्यावरील पोरेज टीव्हीएस शोरूमच्या कॅशियरला गाडीचे पैसे शोरूमच्या खात्यावर भरावयाचे असल्याचे सांगून त्याच्यासोबत बँकेत प्रवेश केला. त्यानंतर शोरूमचाच कर्मचारी असल्याचे भासवत भरलेली 2 लाख 17 हजारांची रक्‍कम बँकेतील रोखापालाकडून घेऊन एकजण पसार झाला. याप्रकरणी शोरूमचे रोखापाल अशोक दशरथ बागल (वय 56, रा. हरिपूर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. 

पुष्पराज चौकातील एचडीएफसी बँकेत गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी बागल शोरूमची सव्वादोन लाखांची रोकड भरण्यासाठी पुष्पराज चौकातील एचडीएफसी बँकेत गेले होते. त्यावेळी 45 ते 50 वयोगटातील एकाने त्यांना गाठले. त्यांच्या शोरूममधून गाडी खरेदी करायची असून त्याची 45 हजार रूपये रोकड शोरूमच्या खात्यावर भरायची आहे असे बागल यांना त्याने भासवले. 

त्यानंतर बागल त्याच्यासोबत बँकेत गेले. तेथे त्याने बागल यांच्यासोबत शोरूममधून आल्याचे भासवत तेथील रोखापालाकडे 2 लाख 17 हजार रूपये दिले. त्यानंतर तो बागल यांच्यासमवेत तेथून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने तो एकटाच परत बँकेत आला. त्यावेळी त्याने बागल यांनी मघाशी दिलेली रक्कम परत मागितल्याचे सांगितले. रोखापालाकडून ती रक्कम घेतली. त्यानंतर तो पसार झाला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयिताचे सीसीटीव्हीत चित्रीकरण

दरम्यान एचडीएफसी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये यातील संशयिताचे चित्रीकरण झाले आहे. त्याचे फुटेज पोलिसांना मिळाले असून त्याद्वारे त्याचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक करू असे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.