Tue, Mar 19, 2019 11:20होमपेज › Sangli › वैधमापनच्या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा

वैधमापनच्या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 10:18PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीस वैध मापन विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश देण्यात आले.  कासेगाव (ता. वाळवा) येथे शौचालय घोटाळा आणि शिराळा येथील दारू दुकान या प्रकरणी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. 

   शेतकर्‍यांकडून दूध संकलन करताना वजनकाटे न वापरता मापे वापरण्याचा नियम आहे. तरीही   सर्वत्र वजनकाटे वापरून शेतकर्‍यांची लूट केली जात आहे अशी तक्रार सुयोेग औंधकर यांंनी केली आहे. या मागणीसाठी कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी जागेवर नसल्याने  कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करीत सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर मापाने दूध घ्यावे, असे आदेश सरकारने दिले. मात्र त्याला दूध  संस्थांनी विरोध केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत हा प्रश्‍न उपस्थित झाला होता.   

मात्र वैध मापन विभागाचे अधिकारीच उपस्थित नव्हते. त्याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील म्हणाले, गेल्या पंधरा वषार्ंपासून दूध उत्पादक शेतकर्‍यांची वजनकाट्यामुळे लाखो रुपयांची लूट सुरू आहे. ती थांबवण्यासाठी शेतकरी प्रतिनीधी दूध संस्था आणि वजनमापे विभागाची एकत्र बैठक घ्यावी.  

कासेगाव येथे शौचालय उभारताना रोजगार हमी योजनेअंतर्गत बोगस कामगार दाखवून करण्यात आलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी   निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकुर्णी यांनी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांना  फैलावर घेतले. चुकीला शिक्षा देण्याऐवजी पाठीशी घालण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा दिला. 

कायद्याचा सोईस्कर वापर करून लोकांच्या भावनांशी, प्रश्‍नांशी खेळू नका असा थेट इशारा   कुलकर्णी यांनी उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना दिला. शिराळा बसस्थानकालगतच दारूचे दुकान स्थलांतरित करण्यात आले आहे. ग्रामस्थांचा त्याला विरोध आहे. बाबासाहेब माने व इतरांनी याबाबत समितीकडे तक्रारही केली आहे. यावेळी काही बोगस दाखलेही सादर करण्यात आल्याचे समोर आले. 
बोगस दाखल्यांप्रकरणी गुन्हे दाखल करावेत. तसेच दारू दुकान हे बसस्थानकाच्या गेटपासून 100 मीटर अंतरावर नव्हे; तर बसस्थानकाच्या कोणत्याही दिशेच्या हद्दीपासून 100 मीटरच्या आत नसावे असे सुचित करीत दारू दुकान प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले.