Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Sangli › युवकाचे पुन्हा शोले स्टाईल आंदोलन

युवकाचे पुन्हा शोले स्टाईल आंदोलन

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

लष्करात नोकरीचे आश्‍वासन देऊनही ते पूर्ण न केल्याने मंगळवारी एका युवकाने  बीएसएनएलच्या टॉवरवर दुसर्‍यांदा चढून शोले स्टाईल आंदोलन केले. अनिल हणमंत कुंभार (वय 26, रा. इटकरे, ता. वाळवा) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. 

अनिलने आयटीआयचा वेल्डरचा कोर्स केला आहे. त्याने यापूर्वी भरतीसाठी प्रयत्न केला होता. मात्र त्याला त्यामध्ये यश आले नाही. निराशेतून दि. 27 ऑगस्ट रोजी तो स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला होता. त्यावेळी  त्याची समजूत घातल्यानंतर तो खाली उतरला होता. 

दि. 27  रोजी त्याला नोकरी देण्याचे आश्‍वासन अग्नीशमन तसेच पोलिस अधिकार्‍यांनी दिले होते. ते  पूर्ण न केल्याने तो मंगळवारी पुन्हा टॉवरवर चढला होता. त्यानंतर त्याने पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांना मिस कॉल दिला. चौधरी यांनी त्याला फोन केल्यानंतर त्याने  टॉवरवर चढल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांसह अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.  उपनिरीक्षक चौधरी आणि अग्नीशमन दलाचे एक अधिकाऱी स्वतः टॉवरवर चढले. त्याला एक तासाच्या प्रयत्नानंतर सुरक्षित खाली आणले. पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.