होमपेज › Sangli › शिवसेना नेत्यांची स्वबळाची तयारी

शिवसेना नेत्यांची स्वबळाची तयारी

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 9:08PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीची  रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपबरोबरच काँग्रेस - राष्ट्रवादी  आणि इतर पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.  मात्र शिवसेनेच्या  नेत्यांचे सूर अद्याप जुळलेले दिसत नाहीत.  त्यांच्यात निवडणुकीबाबत वेगवेगळी वक्तव्य सुरू आहेत. एकदिलाने  निवडणूक लढवण्याबाबत अद्याप चर्चेचे गुराळ सुरूच आहे.  

शिवसेना हा राज्यात सत्तेत सहभागी पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत हा पक्ष जोरदार लढत देणार असे चित्र होते.  खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव , उपमहापौर गटाचे नेते शेखर माने हे काँग्रेसमधून सेनेत आल्यामुळे त्याला पृष्टीही मिळाली. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संभाजी पवार गटाने शिवसेनेत प्रवेश करुन जोरदार लढत दिली होती. सेनेत नव्याने दाखल झालेली ही मंडळी आणि शिवसेनेची मूळची जुनी मंडळी यांची एकत्रित मोट बांधून ते जोरदार लढत देणार असे चित्र तयार झाले होते. खासदार गजानन कीर्तीकर यांनी येथे दोन-तीन बैठक घेऊन त्यांना ऊर्जा देण्याचाही प्रयत्न केला.

बूथनिहाय समित्याही स्थापन झाल्या. कीर्तीकर यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी सर्व प्रकारची रसद आणि ताकद देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरु झाली तरी सेनेच्या जुन्या- नव्या नेत्यांचा सूर जुळलेला दिसत नाही. पक्षांच्या नेत्यांकडूनच वेगवेगळी वक्‍तव्ये पुढे येत आहेत.  पर्यावरणमंत्री रामदास कदम येथे कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने आले होते.  त्यावेळी पक्षाच्या अनेक  कार्यकर्त्यांना वेळेवर निरोप मिळाले नव्हते. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यातच  कदम यांनी  माजी आमदार संभाजी पवार फक्त शिवसेनेत आले होते. त्यांच्या गट काही शिवसेनेत आला नाही, असे जाहीर विधान केले. त्यामुळे पक्षात चांगलीच खळबळ उडाली. सेनेच्या येथील एका गटाने मुद्दाम चुकीची माहिती दिल्याने मंत्री कदम यांनी असे विधान केल्याची चर्चा त्यानंतर रंगली.   

मात्र खासदार कीर्तीकर यांनी शनिवारी नगरसेवक गौतम पवार आणि पृथ्वीराज पवार यांना प्रसार माध्यमांसमोर उपस्थित  करीत पवार गट आमच्याबरोेरच आहे, असा खुलासा केला. दरम्यान, सेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी मिरज येथे शिवसेनेची आम आदमी पार्टी, सुधार समिती यांच्याबरोबरही आघाडीबाब चर्चा सुरू असल्याचे गेल्या आठवड्यात सांगितले होते. दुसर्‍या बाजूला खासदार कीर्तीकर, मंत्री कदम मात्र सेना कोणत्याही स्थितीत स्वबळावरच निवडणूक लढवणार, असे सांगत आहेत. त्यामुळे सेनेत नेमके काय चालले आहे, याचा अंदाज इच्छुक उमेदवारांनाही लागेनासा झाला आहे.  निवडणुकीचे नेतृत्व घेण्यास स्थानिक नेता कोणी तयार नसल्याची चर्चा पाठीमागे रंगली होती.  मात्र तरीही नेत्यांच्या सततच्या दौर्‍यांमुळे आणि मेळाव्यांमुळे निवडणुकीसाठी शिवसेना क्रमाक्रमाने सज्ज होताना दिसते आहे.भाजपला थेट विरोध असे मुख्य सूत्र आहे.