Sun, May 19, 2019 22:02होमपेज › Sangli › महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवा

महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवा

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 12:34AMसांगली : प्रतिनिधी

जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपला महापालिकेत  सत्ता दिली, मात्र त्यांनी सांगलीचा विकास केला नाही. त्यामुळे या डल्ला मारणार्‍यांना घरी पाठवून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांनी शनिवारी येथे केले. 

महापालिका निवडणुकीच्या निमित्त येथील स्टेशन चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते शिवसेना अ‍ॅपचे उद्घाटन आणि विकासकामाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

प्रा. बानुगडे- पाटील म्हणाले, सांगलीचा इतिहास मोठा असला तरी वर्तमान बिकट आहे. स्कायवॉक, मोनोरेल, वारणा पाणी योजना अशा विकासाच्या मोठ्या घोषणा झाल्या. मात्र कोणत्याच सुविधा मिळालेल्या नाहीत. येथे माणसे राहतात, हेच सत्ताधारी विसरले. अनेक संस्था मोडीत निघाल्या. नोकरीसाठी तरुणांना बाहेर पडावे लागले. विकास आराखड्याची अंमलबजावणी नाही. विकासाऐवजी सर्व सत्ताधार्‍यांनी मिशन कमिशन मोहीम राबवली.तीच मंडळी ठेकेदार बनली. तीस रुपये लिटर असलेले पेट्रोल 80 रुपयावर गेले. नोटाबंदी, जीएसटीचा फटका बसला. हे कसले अच्छे दिन आहेत? त्यामुळे सर्वांना धडा शिकवा. 

पृथ्वीराज पवार म्हणाले, चार वर्षांत काही न करणारे आता तीस कोटींची रस्त्याची कामे केली म्हणून छाती बडवून घेत आहेत. मात्र संभाजी पवारांनी 70 कोटी रुपयांची कामे केली. लाटेवर निवडून आलेल्यांना आता सांगली जिंकलीच, असे वाटते आहे. मात्र त्यांचा हा आत्मविश्‍वास घातक ठरणार आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव म्हणाले,  भाजपची लाट आता ओसरली आहे. गेल्या वीस वषार्ंत तेच ते नगरसेवक सत्तेत आहेत. त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याची कामे सुरू केली आहेत. मात्र जनता आता फसणार नाही. 

नगरसेवक शेखर माने म्हणाले, सत्ताधार्‍यांच्या खाबूगिरीला आम्ही चाप लावला. शिवसेनास्टाईल आंदोलनामुळे शहरात 24 कोटी रुपयाची कामे झाली. सर्वच पक्षांनी महापालिकेत सत्ता उपभोगली आता शिवसेनेला संधी आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते,  माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, रावसाहेब खोजगे, अजिंक्य पाटील, पंडितराव बोराडे, नितीन काळे आदिंची भाषणे झाली.  माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, आनंदराव पवार, अनिल शेटे आदी उपस्थित होते. शंभूराजे काटकर यांनी प्रास्ताविक केले. 

 

Tags : sangli, sangli news, Municipal Corporation, Shivsena, Nitin Banugade patil,