Sat, Aug 24, 2019 21:42होमपेज › Sangli › शिवसेनेत फूट, पवार गटाचा सवता सुभाच

शिवसेनेत फूट, पवार गटाचा सवता सुभाच

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:27PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार संभाजी पवार गटाने यावेळीही स्वतंत्र स्वाभिमानी विकास आघाडी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे एकत्रित निवडणूक लढविण्याच्या नेत्यांच्या प्रयत्नाला अपयश आले आहे. माजी आमदार संभाजी पवार गटाने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर नगरसेवक शेखर माने, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव हे शिवसेनेत आल.त्यामुळे पक्ष महापालिका निवडणुकीत जोरदार लढत देणार असे चित्र तयार झाले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही येथे सभा, बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवार गटाची वेगळी भूमिका  दिसू लागली होती. शिवसेनेच्या काही कार्यक्रमांना नगरसेवक गौतम पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य पृथ्वीराज पवार हे अनुपस्थित असायचे. काही दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री  रामदास कदम यांनी पवार गट सेनेत आलाच नव्हता, असे वक्तव्य केले. त्यानंतरही खासदार गजानन किर्तीकर यांनी  गौतम आणि पृथ्वीराज यांना बरोबर घेऊन पवार गट  शिवसेनेतच आहे, असे जाहीर केले. 

हा गट आपल्याबरोबर राहील, असे सेनेच्या वरिष्ठ  नेत्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होते. मात्र, स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढविण्याची परंपरा पवार गटाने यावेळीही कायम राखली आहे. माजी आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या  महापालिका निवडणुकीत   भाजपने शिवसेना आणि इतर पक्षांना बरोबर घेऊन आघाडी केली होती. यावेळीही त्यांनी आघाडीची परंपरा कायम राखली आहे. त्यात त्यांनी उपमहापौर विजय घाडगे,  बाळासाहेब गोंधळे, शिवराज बोळाज आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका आशा शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.