Thu, Nov 15, 2018 07:34होमपेज › Sangli › शिवसेनेची भिस्त इतर पक्षातील नाराजांवर 

शिवसेनेची भिस्त इतर पक्षातील नाराजांवर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : शशिकांत शिंदे

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच सेनानेत्यांकडे संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षाकडे काही प्रभागात   ताकदीचे उमेवार असले तरी अनेक प्रभागात इतर पक्षातील नाराज उमेदवारांवरच भिस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत  अनिश्‍चितता असणार आहे.  

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास अनेकांचे उमेदवारीचे पत्ते कापले जाणार आहेत. प्रभाग मोठा असल्याने अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवणे सहजसोपे नाही. त्यामुळे दोन्ही काँग्रेस किंवा भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास सेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचे  अनेकांचे मनसुबे आहेत. त्या दृष्टीने इच्छुकांनी सेनेच्या नेत्यांबरोबर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार संभाजी पवार यांनी ‘जयंतनीती’ रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. मात्र त्याला सध्या तरी भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. भाजप चर्चेला बोलावत नसेल तर आपण एकतर्फी प्रेम कशासाठी करायचे असा सवाल सेनेतील काही जुने निष्ठावंत करीत आहेत. 

दुसर्‍या बाजूला भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक आजी- माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा आहे.  यातील आपल्या गळाला कोण लागेल याकडे सेनेचे नेते लक्ष ठेवून आहेत.  काँग्रेसमधील भाऊगर्दी आणि  राष्ट्रवादीतील धुसफूस  यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होऊ शकतो. सांगली विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पवार यांना चांगली मते मिळालेली होती. मिरज येथे ही गेली अनेक वषार्ंपासून  पक्षाला चांगला जनाधार आहे. त्याचा फायदा महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो. मात्र त्यासाठी सेनेतील  नव्या जुन्या गटांनी एकत्र आल्यास हे शक्य होणार आहे. 

माजी आमदार पवार यांच्या गटाचा प्रभाव हा गावभाग परिसरात अधिक आहे.  त्यामुळे या ठिकाणचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते ताकद पणाला लावतील. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 
काँग्रेसमधील नाराज नगरसेवकांचा स्वतंत्र गट शेखर माने यांनी तयार केला. त्या गटाने उपमहापौरपद पटकावले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव  शिवसेनेत  आहेत. त्यांचा खणभाग परिसरात प्रभाव आहे. या ठिकाणी काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यावरून संघर्ष होणार आहे. त्याचा फायदा जाधव कसे घेतात याबाबत उत्सुकता आहे.

Tags : Sangli, Sangli News, Shiv Sena, leaders, started, alliance, municipal elections


  •