Tue, Mar 19, 2019 15:42होमपेज › Sangli › निवडणुकीचा बाजार करणे भाजपचा उद्योगच : शेखर माने

निवडणुकीचा बाजार करणे भाजपचा उद्योगच : शेखर माने

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 7:59PMसांगली : प्रतिनिधी

प्रत्येक निवडणुकीचा बाजार करणे, उमेदवार फोडणे हा भाजपचा उद्योगच आहे, असा टोला शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने यांनी लगावला. ते म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेच जनतेला भेटवस्तू वाटण्याची भाषा करीत आहेत, हा प्रकार निषेधार्ह  आहे. पण निष्क्रिय भाजपला सांगलीकर भेटवस्तू नाकारूनच जागा दाखवतील.

माने म्हणाले, पैसा, सत्तेच्या आमिषाने कार्यकर्त्यांना पक्षात घेणे. प्रशासनातील अधिकार्‍यांना आपल्या फायद्यासाठी वापरणे हे तंत्रज्ञान भाजपने सत्तेवर आल्यापासून प्रत्येक निवडणुकीत वापरले. सांगलीतही अधिकार्‍यांना हाताशी धरून कामे अडविण्याचा  उद्योग केला आहे. 

ते म्हणाले, या आधीही भाजप महाआघाडीच्या माध्यमातून महापालिकेच्या सत्तेत होताच. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शहराला न झेपणार्‍या मोठ-मोठ्या योजना आणल्या आणि ठेकेदारीच्या माध्यमातून योजनेच्या नावावर उखळ पांढरे करून घेतले. त्या ड्रेनेज, घरकुलसह विविध योजनांचे काय झाले, याचा हिशेब त्यांनी जनतेला द्यावा.  सत्तेत आल्यानंतर या योजना पूर्ण करण्यासाठी किती निधी दिला? गेल्या साडेतीन-चार वर्षांत शहराच्या विकासासाठी भाजपने काय केले, हेसुद्धा स्पष्ट करावे.

माने म्हणाले, काहीही करून सत्तेत यायचे आणि  ओरबाडायचे असा भाजपचा छुपा अजेंडाच आहे. गेल्या चार-सहा महिन्यांपासून महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले. पण सर्व्हेक्षणात स्पष्ट दिसू लागले आहे. 

त्यामुळे आता तर निवडणुकीच्या पूर्वीच मतदाराला भेटवस्तूद्वारे खरेदी करायची उघड भाषा खुद्द महसूलमंत्री करीत आहेत. चार-चारवेळा बूथमार्फत जनतेपर्यंत पोहोचा, असे सांगत आहेत. हा मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार आहे. परंतु तिन्ही शहरातील जनतेने आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही.  त्यामुळे जनता भाजपला जागा दाखवून त्यांचे सत्तेचे दिवास्वप्नच ठरवेल.