Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Sangli › द्राक्षबाग नुकसानीची भरपाई मिळवून देऊ

द्राक्षबाग नुकसानीची भरपाई मिळवून देऊ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तासगाव : प्रतिनिधी 

अवेळीचा पाऊस व दावण्या रोगाचा हल्ला यामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्षबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. भाजप सरकारला नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यायला भाग पाडू, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली. रविवार (दि 26) रोजी उद्धव ठाकरे यांनी तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील अशोक जयसिंग मदने यांच्या दावण्याने बाधित द्राक्षबागेची पाहणी करुन शेतकर्‍यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. पीक छाटणी झालेल्या दिवसापासून ते द्राक्षे बाजारपेठेत जाण्याच्या दिवसापर्यंत पीकविम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी विमा कंपनीकडे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना देणार असल्याचे सांगितले. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी द्राक्षबागांच्या नुकसानीची माहिती दिली.

यावेळी खासदार गजानन कीर्तीकर आमदार अनिल बाबर, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे - पाटील, आनंदराव पवार, संजय विभूते, तासगाव तालुका प्रमुख श्रीकांत चव्हाण, युवासेना प्रमुख अमोल काळे, ज्ञानेश्वर चव्हाण,  संदीप शिंत्रे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तासगावचे तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे, कृषी सहाय्यक शारदा पाटील, राम शिंदे यांच्यासह शेतकरी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकर्‍यांना औजारे वाटप

तासगाव : प्रतिनिधी 

उन्नत शेती समृद्ध  शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत तासगाव तालुक्यातील लाभार्थींना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ट्रॅक्टर आणि पावर ट्रिलरचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील आळते येथील अजित पाटील यांना 35 एचपी तर वैष्णवी पाटील यांना 20 एचपीच्या ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले .शहाजी पाटील, मीनाताई पोतदार, दशरथ पाटील, हणमंत लाड यांना पॉवर ट्रिलरचे वाटप करण्यात आले. 

यावेळी खासदार गजानन कीर्तीकर आमदार अनिल बाबर, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे - पाटील आनंदराव पवार, संजय विभूते, तासगाव तालुका प्रमुख श्रीकांत चव्हाण, युवासेना प्रमुख अमोल काळे,  ज्ञानेश्वर चव्हाण, कृषि उप संचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा कृषि अधीक्षक राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, तासगावचे तालुका कृषि अधिकारी राजाराम शिंदे, कृषि सहाय्यक शारदा पाटील, राम शिंदे यांच्यासह लाभार्थी व शेतकरी, उपस्थित होते.