Mon, Mar 25, 2019 13:12होमपेज › Sangli › शिवसेना, स्वाभिमानीला  चिंतन करायला लावणारा निकाल

शिवसेना, स्वाभिमानीला  चिंतन करायला लावणारा निकाल

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 10:52PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा निकाल लागला आहे. उमेदवारीवरून मतभेद होऊन स्वतंत्र लढल्यामुळे याचा फटका दोघांनाही बसला.

दरम्यान, जनता दल, भाजप आणि आता शिवसेनेबरोबरही फारकत घेतलेल्या माजी आमदार संभाजी पवार  गटाची पुढील भूूमिका काय असणार आणि या गटाचे पुढे काय होणार, याचीही चर्चा आता होत आहे. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार गजानन किर्तीकर, उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी  गेल्या काही महिन्यात येथे लक्ष घातले होते. बैठका, सभा घेऊन कार्यकर्त्यांची बांधणी केली. तोडीस तोड लढत देण्यासाठी तयारी केली. मात्र  उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत पवार गटाची  भूमिका तळ्यात मळ्यात राहिली. गौतम पवार आणि पृथ्वीराज पवार सेनेच्या बैठकीस कधी उपस्थित असायचे, तर कधी अनुपस्थित असायचे.  ऐनवेळी तीन प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निवडणुकीच्या धामधुमीत पवार गट आणि शिवसेनेतील नेत्यांत आरोप- प्रत्यारोप झाले. त्याचा फटका दोघांनाही बसला. प्रचारासाठी सेनेचे कोल्हापुरातील आमदार येथे आले. मात्र जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर या निवडणुकीकडे फिरकलेच नाहीत.  शिवसेनेने शेवटच्या टप्यात मंत्रीमंडळातील रामदास कदम, विजय शिवतारे, अभिनेता आदेश बांदेकर आदींच्या   सभा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरच भाजपच्या कारभाराविरोधात त्यांनी रान उठवले. मात्र मतदारांच्या नाराजीचा सूर मतामध्ये त्यांना रुपांतरीत करता आला नाही. काही जागा निवडून आल्यास त्रिशंकू स्थितीत सत्ता स्थापन करण्यात आपली भूमिका महत्वाची ठरेल, असे सेनेच्या नेत्यांना वाटत होते. मात्र  36 हजार मतापर्यंतच  त्यांना मजल मारता आली. 

दुसर्‍या बाजूला स्वाभिमानी विकास आघाडीलाही यश मिळाले नाही. अनेक वर्षापासून गावभाग हा त्यांचा असलेला बालेकिल्ला ताब्यातून यावेळी निसटला. उपमहापौर विजय घाडगे यांनी ऐनवेळी स्वाभिमानीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यात ते विजयी झाले.  हेच काय ते स्वाभिमानीचे यश आहे.

पृथ्वीराज पवार यांनी विधानसभेला जोरदार लढत देत चांगली मते घेतली होती. आता महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसला आहे. आता यापुढे ते काय कारणार आणि या गटाचे काय होणार याची चर्चा आहे.