Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Sangli › कडक बंदोबस्तात शिस्तबध्द मोर्चा

कडक बंदोबस्तात शिस्तबध्द मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथील दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी शिवप्रतिष्ठानतर्फे हजारोंचा मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा पोलिस दलाने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तर पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन संयोजकांनी केले होते. त्यामुळेच हा शिस्तबध्द मोर्चा शांततेत पार पडला. 

प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनच नुकसान भरपाई वसूल करावी, त्यांच्यासह जिग्नेश मेवानी, उमर खलीद, कोळसे-पाटील आदींवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी या मोर्चाची आठ दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर संयोजकांनी युद्धपातळीवर तयारी केली होती. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भिडे यांचे मोठ-मोठे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्याशिवाय व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, फेसबुकसह अन्य सोशल मीडियाद्वारे कार्यकर्त्यांना सहभागाचे आवाहन करण्यात आले होते. 

या मोर्चासाठी महिलांनीही पुढाकार घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी पूर्वतयारी केली होती. मंगळवारी बंदोबस्ताची रंगीत तालीमही घेतली होती. मोर्चाच्या प्रारंभीच दोन उपअधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलिस होते. शिवाय मोर्चेकर्‍यांमध्येही साध्या वेशातील पोलिसांचीही संख्या अधिक होती. त्याशिवाय मोर्चा मार्गासह अन्य संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

गडकोट मोहिमांमध्ये शिवप्रतिष्ठानकडून दाखविण्यात येणारी शिस्त याही मोर्चात दिसून आली. यासाठी कार्यवाह नितीन चौगुले, देवा गायकवाड, अमित करमुसे, शशि नागे यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्नशील होते. एकंदरीत सुयोग्य नियोजन आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त यामुळे हा मोर्चा शांततेत शिस्तबद्धपणे पार पडला.

विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून पाहणी...

या मोर्चाला कर्मवीर चौकातून प्रारंभ करण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील या ठिकाणी आले. अधिकार्‍यांकडून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर मोर्चा मार्गावरून जात त्यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. मोर्चा पूर्ण झाल्यानंतरच ते कोल्हापूरला रवाना झाले. 

पार्किंगची चोख व्यवस्था, रुग्णवाहिकेचीही सोय

सांगलीत होणार्‍या या मोर्चासाठी हजारो समर्थक येणार असल्याने नेमिनाथनगर, आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी संयोजकांतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय रुग्णवाहिकांचीही सोय करण्यात आली होती. यावेळी रुग्णवाहिकेला वाट देताना मोर्चेकर्‍यांनी शिस्तबध्दतेची प्रचिती दिली. 

 

Tags : sangli, sangli news, Shiv Pratishthan, Sambhaji Bhide, Rally, Bhima Koregaon Riots case,


  •