Tue, Jun 25, 2019 15:17होमपेज › Sangli › सांगलीतील सात जणांना शिवछत्रपती पुरस्कार

सांगलीतील सात जणांना शिवछत्रपती पुरस्कार

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 13 2018 12:29AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. सांगली जिल्ह्यातील सात खेळाडूंचा त्यामध्ये समावेश आहे. बापू अकबर समलेवाले (क्रीडा संघटक), नितीन शशिकांत मदने (कबड्डी), कौशल्या कृष्णात वाघ (कुस्ती), समीर दिलीप कठमाळे (बुद्धिबळ), अभिनंदन सदाशिव भोसले (सायकलिंग), नरेश शामराव सावंत (खो-खो), शाहिदअहमद शब्बीर जमादार (सायकलिंग) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

तसेच 2016-17 सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोल्हापूरच्या बिभीषण पाटील यांना जाहीर झाला आहे. यासोबत पुण्याच्या रमेश तावडे (2014-15) आणि अरुण दातार (2015-16) यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये 3 लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मीकी यांना थेट शिवछत्रपती राज्य क्रीडा 
पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ग्रँड मास्टर विदित गुजराथी यालाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 7 महासागर पार करत जागतिक विक्रम करणारा जलतरणपटू रोहन मोरे यालाही थेट पुरस्काराने गौरविण्यात येईल.

पुरस्कारांसाठी 776 अर्ज आले होते. यामधून 195 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल यांच्या हस्ते 17 फेब्रुवारीला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडणार आहे.