Sun, Jul 21, 2019 10:42होमपेज › Sangli › शिराळा पश्‍चिम भागात निवडणुकीची तयारी

शिराळा पश्‍चिम भागात निवडणुकीची तयारी

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:09AMबिळाशी  ः  भीमराव बांदल     

भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व महाडिक युवाशक्‍ती यांनी शिराळा तालुक्यात विविध कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आत्तापासून तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील विविध कार्यक्रमातून नेत्यांची होणारी राजकीय भाषणांची चर्चा सुरू आहे. तालुक्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसताना राजकीय वातावरण तापू लागले आहे.

प्रत्येक नेत्याला  स्वतःच्या गटाचे आस्तित्व टिकविण्यासाठी जोराची धडपड सुरू आहे. कोण-कोणत्या पक्षाकडील आपल्या गटात खेचण्याची स्पर्धाही लागली आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. 

सध्याचे वातावरण पाहता वाळवा तालुक्यातील दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे गृहित धरून सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे मतदान राखण्याबरोबरच त्यात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राजकीय खेळ्या वेगवेगळ्या मार्गानी सुरू आहेत.
आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह त्यांचे पुत्र रणधीर नाईक, सत्यजित नाईक यांनीही विविध कार्यक्रमातून जनसंपर्क वाढविला आहे.  माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी विश्‍वास उद्योग समूह आणि आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून कामे सुरू ठेवली आहेत.

तालुक्यातील युवकांना संघटनेत सहभागी करून घेत राष्ट्रवादी मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनीही आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या  माध्यमातून कामांचा सपाटा लावला आहे.

महागाई, पेट्रोल दरवाढ, कर्जमाफी आदी मुद्यांवर भाजप सरकारविरोधात मोर्चे काढले आहेत.  आगामी विधानसभेच्या निवडणुकीची चांगलीच मशागत सुरू केली आहे.  जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांनी महाडिक युवाशक्‍तीच्या माध्यमातून युवकांचे मजबूत संघटन केले आहे. बेरोजगार युवकांसाठी नोकरी मेळावे घेत त्यांना काम देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

शिराळा तालुक्यात वाकुर्डे बुद्रूक योजना, नागपंचमी, गिरजवडे प्रकल्प, शेतीचे व पिण्याचे पाणी, चांदोली पर्यटन, वाळवा तालुक्याच्या पश्‍चिम भागात शेतीसाठी पाणी, बेरोजगारी आदी महत्त्वाच्या समस्या आहेत. या समस्या भोवतीच विधानसभेचे राजकरण रंगणार आहे.                                                                              

वाळवा तालुक्यातून माजी  जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील तसेच एखादा नवीन उमेदवार वाळवा स्वाभिमान आघाडीच्या माध्यमातून पुढे येण्याची शक्यता आहे. शिराळा मतदारसंघातून यावेळी विविध पक्षासह पाच किंबहुना त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे. शिराळा तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावातील मतदारावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांना नेत्यांच्या समोर सारखे असून हा आपला कार्यकर्ता आहे. आपले मतदान शाबुत ठेवण्याबरोबरच विरोधी गटातील मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविण्याचे काम आता सुरू आहे. कार्यकर्ते नेत्यांच्या मतासाठी सक्रीय झाले आहेत.