शिराळा तालुक्यात ५ पर्यंत ७१.७१ टक्के मतदान 

Last Updated: Oct 21 2019 6:44PM
Responsive image
 शिराळ्‍यात मतदान केंद्रावर लागलेली रांग

Responsive image

शिराळा : प्रतिनिधी

शिराळा तालुक्‍यात सकाळी अकरापर्यंत अत्यंत संथ गतीने मतदान सुरू होते. सकाळी 9 पर्यंत 9 तर अकरापर्यंत 15.52 टक्के मतदान झाले होते. दुपारपर्यंत ५७.५७ टक्के,  तर ५ पर्यंत ७१.७१ टक्के मतदान झाले.

आज सकाळी चिखली येथे माजी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार शिवाजीराव नाईक तर कोकरूड येथे सत्यजित देशमुख यांनी मतदान केले. सम्राट महाडिक यांनी पेठ येथे मतदान केले. पाऊस सुरु असल्याने सकाळी सर्वांनी कामे आटोपून पुन्हा मतदान करणासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे दुपारनंतर मतदान टक्केवारी वाढली.

या गावता मतदान यंत्रे पडली बंद 

इंगरुळ, फकिरवाडी, शिराळा,पुनवत,ऐतवडे खुर्द, येलूर,अंत्री खुर्द,तांबवे, काळुंद्रे, करुंगली, केदारवाडी, मोरेवाडी, भाटशिरगाव, शिरशी, मानकरवाडी, ढोलेवाडी, बिळाशी, सागाव या गावातील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे बंद पडली.

 तिन्ही उमेदवारांच्‍या मतदान केंद्राना भेटी

आज सकाळी या तिन्ही उमेदवारांनी शिराळा येथील मतदान केंद्रावर जाऊन भेटी दिल्या. यंत्रणा सज्ज होती. शिराळा विधानसभा मतदारसंघात 334 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रावर होणाऱ्या मतदान प्रक्रियासाठी  2004 कर्मचारी नेमण्यात  आले होते. देखरेख करण्यासाठी 31 झोनल अधिकारी असून प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक पोलिस  व  एक शिपाई ठेवण्यात आला होता. मतदान अधिकारी व कर्मचारी यांना नेण्यासाठी आणण्यासाठी 52 एसटी बस व 49 जीप गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे. 200 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते. 31 अधिकारी आहेत. मतदारसंघात खुंदलापूर, मिरुखेवाडी, मणदूर धनगरवाडा, बेर्डेवाडी, याठिकाणी नेट सुविधा नसल्यामुळे वेब सुविधा ठेवण्यात आली होती. 

33 मतदान केंद्राचे नेटद्वारे कास्टिंग होणार आहे. विधानसभा मतदारसंघात 3894 दिव्यांग मतदारांच्‍यासाठी व्हीलचेअर  व वाहन व्यवस्था करण्यात आली होती. 

विधानसभा मतदारसंघात 2 लाख 91 हजार 779 तर पुरुष मतदार 1लाख 49 हजार 853 व स्त्री मतदार 1लाख 42हजार 925 आहेत व इतर एक आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्यसुविधा पुरवली होती. मेडिकल किट तसेच पाळणाघर व मदतनीस याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. ईव्हीएम मशीन चारशे असून, व्हीव्हीपॅट 435, सीयू मशीन 400 वापरण्यात आली. पाडळी व चिखलवाडी केंद्रावर महिला मतदान केंद्र (पिंक पोलिंग स्टेशन) उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह सर्व महिला कर्मचारी कामकाज पाहत आहेत.

मतदानाच्‍या वेळी  अनुचित प्रकार होऊ नये म्‍हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये एक पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक,  20 पोलिस उपनिरीक्षक, 305 पोलिस, 174 होमगार्ड त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील पाच पोलिस अधिकारी,  ९० पोलिस कर्मचारी आहेत. आरसीपी एक पथक होते.  मतदारसंघात 8 संवेदनशील गावे असून त्यामध्ये खुंदलापुर, शिराळा, मांगले, वाटेगाव, नेर्ले, पेठ, कामेरी, ऐतवडे खुर्द या गावांचा समावेश आहे. याठिकाणी राखीव फोर्स ठेवण्यात आली असल्‍याची  माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली. 

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अनिल बागल, तहसीलदार गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, ,प्राचार्य रमेश यादव, दुय्यम निबंधक एस. एस. सातपुते उपस्थित होते. ग्रामीण भागात पावसामुळे संथ गतीने मतदान सुरू होते.  शिराळा शहरातील काही मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने मतदान सुरू होते. मतदारांना ने - आण करण्यासाठी रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईहून मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करण्‍यासाठी गावी आले होते.