होमपेज › Sangli › शिराळा सेतू कार्यालयास अडीच लाख दंड

शिराळा सेतू कार्यालयास अडीच लाख दंड

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 9:32PM

बुकमार्क करा
शिराळा ः प्रतिनिधी 

येथील सेतू कार्यालयाकडून विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी जादा रक्कम घेतली जाते, अशा तक्रारी आहेत. तसेच वारंवार सूचना करूनही कामात कोणतीही सुधारणा करीत नाहीत अशा   कारणांमुळे तहसीलदार दीपक शिंदे यांनी सेतू कार्यालयास अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम  दि. 6 जानेवारीपर्यंत न भरल्यास सेतू चालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे. तहसीलदार कार्यालयाजवळ गुजरात इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड  (अहमदाबाद) यांचे  एकात्मिक नागरी सुविधा केंद्र आहे. या कार्यालयास तहसीलदारांनी दि.28 डिसेंबररोजी सील ठोकले होते.

याआधी या कार्यालयास तीनदा सील ठोकले होते. तसेच जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी या सेतूची  तपासणी केली होती. त्यावेळीही गंभीर चूक आढळल्याने त्यांनी या कार्यालयास दहा हजार रुपये दंड केला होता.  कामात सुधारणा करण्याची नोटीस दिली होती. तहसीलदारांनीही कामात सुधारणा करण्याचा सूचना दिल्या होत्या. जादा पैसे घेण्याबाबत तक्रारी आल्याने अठरा नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले. दरफलक दर्शनी भागात न लावणे, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था नसणे, शासन निर्णयानुसार फी न घेणे, नागरिकांशी सौम्य भाषेत न बोलणे  असे दोष ठेऊन आज तहसीलदार शिंदे यांनी  दंडाची नोटीस बजावली.