Tue, Jul 23, 2019 11:11होमपेज › Sangli › शास्त्री चौक, दत्त-मारुती रस्ता खड्ड्यांत

शास्त्री चौक, दत्त-मारुती रस्ता खड्ड्यांत

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 25 2018 1:17AMसांगली : प्रतिनिधी

सांगली शहरातील मुख्य वर्दळीचा मार्ग असलेला शास्त्री चौक ते दत्त-मारुती रस्ता अगदी गणपती पेठेपर्यंत खड्ड्यांत अडकला आहे. अतिक्रमणे, रस्त्यांच्या मधोमध असलेले चेंबर्स, धोकादायक मोडकळीस आलेल्या गटारी अशा दुरवस्थेमुळे रस्त्याचा कोंडमारा झाला आहे. परंतु शहरातील मध्यवर्ती अशा या रस्त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. शहराला स्मार्ट बनवू अशा घोषणा झाल्या, पण या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

शहरातील भरपूर लोकवस्ती आणि बाजारपेठांचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून रोज हजारो नागरिकांची वर्दळ सुरू असते. वास्तविक रस्ता रुंदीकरणाचा अनेक वर्षांचा प्रश्‍न तब्बल सात-आठ वर्षांपूर्वी निकाली निघाला. परंतु चार-दोन अतिक्रमणांमुळे रस्ता पूर्ण क्षमतेने रुंदीकरणानंतर वापरात आलेला नाही. येथील शास्त्री चौक ते अंकली पोलिस चौकीपर्यंत कमी-जास्त प्रमाणात असलेले हे अतिक्रमण आणि खड्ड्यांचे चित्र विदारक आहे. 

अंकली पोलिस चौकीपासून पुढे काही भागात रस्ता केलेला असला तरी दुतर्फा वाहतुकीत तो अडकलेला आहे.  पुढे विठ्ठल मंदिराजवळ दुरवस्थेतील गटार आणि खड्ड्यांनी रस्त्यावर अपघाताचा सापळाच बनला आहे.  मारुती चौक ते बालाजी चौक-गणपती पेठेपर्यंत रस्त्यांवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. भरीस भर म्हणून फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण आणि दुतर्फा पार्किंग यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. 

रुंदीकरणानंतरही काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खांब, लोंबकळणार्‍या विद्युततारा, व्यापार्‍यांचे फलक लटकत आहेत. यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचाही धोका आणि वरून फलक, विद्युतवायरी तुटून पडण्याचीाही भीती असते. परिवर्तनाचे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपकडून तरी यासह शहरातील रस्त्यांचे नियोजन व्हावे. त्यासाठी मास्टर प्लॅन आखून रस्ते खड्डेमुक्‍त तसेच अतिक्रमणे काढून रस्त्यांचा कोंडलेला श्‍वास मोकळा व्हावा. शहराच्या विकासाला गती यावी, अशा अपेक्षा व्यक्‍त होत आहेत.

एकेरी वाहतुकीचा  नियम धाब्यावर

नागरी वस्ती असलेला हा रस्ता आता व्यावसायिक  बाजारपेठेचा बनला आहे. या मार्गावर दुतर्फा विविध दुकाने आणि व्यावसायिक संकुले झाली आहेत. महापालिका प्रशासनाने ही बाब लक्षात घेता बांधकाम परवाने देताना पार्किंगची सक्‍ती करणे गरजेचे होते. पण ते केलेले नाही. त्यामुळे निम्मा रस्ता पार्किंगने व्यापलेला असतो. त्यातच यापूर्वी हा रस्ता मारुती रस्त्यावरून शास्त्री चौकाकडे येण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला होता. त्याची वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे नियम धाब्यावर बसवत सुरू असलेल्या वाहतुकीने दररोज कोंडी कायम असते.

धोकादायक चेंबर्स.. 

कोल्हापूर रस्तामार्गे येणारी वाहतूक बसस्थानक मार्ग तसेच या मार्गाने शहरात शिरते. यामुळे हा शहराच्या प्रमुख मार्गापैकी एक आहे. हा रस्ता दर्जेदार आणि सुसज्ज असावा, अशी साधी-सोपी नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु व्यावसायिक, विक्रेत्यांचे फलक, विविध स्टॉल्ससह वाहनांचे अतिक्रमण या विळख्यातूनच वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत ये-जा करावी लागते. या मार्गावर सुमारे 25 पेक्षाअधिक चेंबर्स खड्डेमय स्थितीत आहेत. चार-दोन ठिकाणी या उलट हे चेंबर्सचे झाकण रस्त्यांपेक्षा उंच अवस्थेत आहेत. त्यामुळे एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे उंचवटे अशी कसरत करावी लागते.