Tue, Nov 20, 2018 02:13



होमपेज › Sangli › शरद पवार यांच्या सूचक वक्‍तव्याने पलूस-कडेगावमध्ये खळबळ

शरद पवार यांच्या सूचक वक्‍तव्याने पलूस-कडेगावमध्ये खळबळ

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 30 2018 12:15AM



सांगली/पुणे : प्रतिनिधी

सांगली-सातारा विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीची असताना काँग्रेसने उमेदवार  उभा केला. त्यावेळी मित्र पक्षाने सत्ता, संपत्ती, साधन याचा वापर केल्याने ही जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली. आता पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने काय भूमिका घ्यावी, असे सूचक वक्‍तव्य राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात केले. यामुळे पलूस-कडेगावमधील राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तसेच पलूस-कडेगाव मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची आज निवड झाली. त्यावेळी पवार यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत काही वक्‍तव्ये केली. एकी करायची असेल तर तिची तत्त्वे सर्वांनी पाळायला हवीत, असे सांगत त्यांनी सांगली-सातारा विधान परिषदेबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर सूचक वक्‍तव्य केले. आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधार्‍यांना पराभूत 

करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. मात्र, मित्रपक्षानेही आमची ताकद पाहून, सन्मानपूर्वक वाटाघाटी कराव्यात. ज्या जागा आम्ही जिंकल्या आहेत, त्या आम्हाला मिळाव्यात. मागील निवडणुकीत मित्रपक्षाने इतरांना मदत करून आमचे उमेदवार पाडले. यावेळी मित्रपक्षाने रडीचा डाव न खेळता समन्वयाची व सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळत खडसावले.

ते म्हणाले, आघाडीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून सांगली-सातारा विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादीची आहे. असे असताना तेथे काँग्रेसने उमेदवार दिला. सत्ता, संपत्ती, साधनांचा वापर करुन ही जागा राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. आता पलूस-कडेगावची पोटनिवडणूक लागली आहे. आता आम्ही काय करायचे. याचे उत्तर मित्र पक्षाला द्यावे लागेल. काँग्रसेची भूमिका समन्वयाची नसेल, त्यांचा व्यवहार ठिक नसेल तर मग आम्ही कोणती भूमिका घ्यायची. अरुण लाड यांनी याबाबत वेगळी भूमिका घेतली तर त्यांना किती दोष देता येईल, असेही ते म्हणाले.

पवार यांच्या या सूचक वक्तव्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आले आहे. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी  उमेदवार देणार काय? अथवा इतर कोणाला मदत करणार काय? असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

पंतप्रधान जिथे बोलायचे तिथे बोलत नाहीत

पवार पुढे म्हणाले की, देशातील महिला, दलित, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याकांबद्दल सरकारची बांधिलकी नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जनता सरकारवर नाराज आहे, ती अस्वस्थ आहे हे त्यांनी सत्ताधार्‍यांना दाखवून दिले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न बोलणारा पंतप्रधान म्हटले जात होते. विद्यमान पंतप्रधान मोदी खूप बोलतात. मात्र, दलितांवरील अत्याचार, नुकतेच घडलेले अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनांवर ते बोलत नाहीत. जेथे बोलायचे तेथे बोलत नाहीत, असा चिमटा शरद पवार यांनी यावेळी काढला.

पवार म्हणाले की, राज्यात पालघर, भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात, सांगलीतील पलूस विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक होणार आहे. सत्ताधार्‍यांना रोखण्यासाठी या निवडणुका मित्रपक्षांना सोबत घेऊन लढण्याची आमची भूमिका आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये, हा आमचा उद्देश आहे. परंतु, आम्ही समन्वयाची भूमिका घेत असताना मित्रपक्षाने तशीच रास्त भूमिका घ्यावी, ही अपेक्षा आहे. सातारा, सोलापूर, भंडारा-गोंदिया या जागा आमच्याकडे असतानाही मित्रपक्षाने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्याचा फायदा विरोधकांना झाला. त्यामुळे पूर्वी ज्या जागांवर जो पक्ष जिंकला आहे, ती जागा त्याच पक्षाने लढवावी, अशी आमची भूमिका आहे.

Tags : Sangli, Sharad Pawar, suggestive, statement,